धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा विजय ः निकम

धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा विजय ः निकम

मंचर, ता. २९ : “मंचर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक मतमोजणीसाठी येताना माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या प्रतिमेला नमस्कार करून मी येथे आलो. माझा लढा सामान्य जनतेसाठी सुरु राहील. शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात उभा राहील. धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा विजय झाला आहे.” असे राष्ट्रवादी कॉंग्रेस बंडखोर विजेते देवदत्त निकम यांना सांगताना गहिवरून आले.
मंचर (ता. आंबेगाव) येथे निवडणूक निकालानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. निकम म्हणाले, “गेल्या ३३ वर्षांपासून ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहे. मला लोकसभा निवडणूक लढवण्याची संधी दिली. भीमाशंकर कारखाना अध्यक्ष, बाजार समिती सभापती या पदावर काम करण्याची संधी दिली. शेतकऱ्यांचे हक्क व हितासाठी काम केले. बाजार समिती डिजिटल केली. शेतकऱ्यांना ४० रुपयात जेवण उपक्रम सुरु केला. पण राष्ट्रवादीतील काही नेत्यांना माझी अडचण वाटू लागली. त्यांनी मला वळसे पाटील यांच्यापासून दूर करण्याचा प्रयत्न केला. माझी उमेदवारी नाकारली. पण मला शेतकऱ्यांनी पाठबळ दिले. त्यामुळे मी निवडणूक लढविली. राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांनी मला उघडपणे पाठींबा दिला. तसेच शिवसेना, भाजप, स्वाभिमानी शेतकरी संघटना यांनी मदत केली. शिवसेनेचे उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी मला मतदान करण्याचे आवाहन केले होते. त्या सर्वांचा मी आभारी आहे.”


“माजी गृहमंत्री दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीने उभ्या केलेल्या भीमाशंकर सहकारी पॅनेलच्या १७ उमेदवारांना मतदारांनी निवडून दिले आहे. सहकार क्षेत्रावर दिलीप वळसे पाटील यांचे निर्विवाद वर्चस्व आहे. हे शेतकऱ्यांनी दाखवून दिले आहे. या पुढे वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बाजार समितीत भाजीपाला, गुरांचा बाजार भरविण्यासाठी व चांडोली खुर्द येथे शीतगृह उभारणीसाठी आम्ही काम करणार आहोत.”
-निलेश (स्वामी) थोरात, संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर


“मंचर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत शिवसेना, भाजप व स्वाभिमानी शेतकरी संघटना पॅनेलला शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. यापुढे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत आमची ताकद दाखवून देऊ.”
-डॉ. ताराचंद कराळे, अध्यक्ष, भाजप आंबेगाव तालुका


“बाजार समिती निवडणुकीत विरोधी पक्षाकडून मोठ्या प्रमाणात अर्थकरण करण्यात आले. निवडणुकीत यश अपयश याचा विचार न करता. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली लढा सुरु राहील.”
अरुण गिरे, शिवसेना प्रमुख, आंबेगाव तालुका

“बाजार समिती निवडणुकीत महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी झाला असून भाजपसह त्यांच्या मित्र पक्षांचे पानिपत झाले आहे. या पुढे जिल्हा परिषद पंचायत समिती व ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये भाजप व त्यांच्या मित्र पक्षांना पळती भुई थोडी करणार अशी रणनीती तयार करू.”
-सुरेश भोर, जिल्हा प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे.


“निवडणूक निकालानंतर दुसऱ्याच्या पंगतीत आग्रह करून वाढायचं अशी केविलवाणी अवस्था भाजप व शिवसेना पक्षाची झाल्याचे पहावयास मिळाले. त्यांना स्वाभिमानी संघटना व अपक्षाची मदत घ्यावी लागली. तरीही शेतकऱ्यांनी त्यांना नाकारले. यापुढे महाविकास आघाडी अजून मजबूत होईल.”
-राजू इनामदार, अध्यक्ष, आंबेगाव तालुका कॉंग्रेस

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com