मंचरला कांद्याच्या बाजारभावात वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मंचरला कांद्याच्या बाजारभावात  वाढ
मंचरला कांद्याच्या बाजारभावात वाढ

मंचरला कांद्याच्या बाजारभावात वाढ

sakal_logo
By

मंचर, ता. २८ : मंचर कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात रविवारी (ता.२८) विक्रीसाठी शेतकऱ्यांनी आणलेल्या कांद्याच्या बाजारभावात गेल्या दोन-तीन महिन्याच्या तुलनेत दहा टक्के वाढ झाली आहे. दहा किलो कांद्यास १३५ रुपये बाजारभाव मिळाला. कांद्याच्या बाजारभावात अजून सुधारणा होईल, शेतकऱ्यांनी निवड करून कांदा विक्रीसाठी आणावा, असे आवाहन मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती वसंतराव भालेराव यांनी दिली.
मंचर बाजार समितीत मागील काही दिवसांपासून कांद्याचे बाजारभाव स्थिर होते. रविवारी अकरा हजार कांदा पिशव्यांची आवक झाली. लिलाव सुरू झाला तेव्हा कांद्याच्या बाजारभावात काहीशी वाढ झालेली आहे. मार्च महिन्यापासून कांद्याला फारच कमी बाजारभाव मिळत होता. खते औषधे मजुरी वाहतूक आदीभांडवली खर्च वाढत असताना कांद्याला बाजारभाव कमी मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आला होता. मध्यंतरी कांद्याचे बाजार भाव दहा किलोस शंभर रुपयापर्यंत खाली आले होते. सध्या नवीन कांद्याची आवक बाजार समितीत मोठ्या प्रमाणात सुरू आहे. पावसाळाजवळ येऊ लागल्याने ज्या शेतकऱ्यांना कांदा साठवणूक करण्याची व्यवस्था नाही. त्यांनी तो विक्रीसाठी बाजारात आणला आहे तर अनेक शेतकऱ्यांनी शेतातील कांदा बराखित साठवून ठेवला आहे. शेतकरी बाजारभाव वाढतील, या प्रतीक्षेत आहेत, असे भालेराव यांनी सांगितले.

आगामी काळात भाव वाढण्याची शक्यता
मंचर बाजार समितीचे उपसभापती सचिन पानसरे व संचालक नीलेश थोरात म्हणाले, की "कांद्याचे बाजार भावदहा टक्क्यांनी वाढले आहेत. एक नंबर गोळा कांदा दहा किलो १२० ते १३५ रुपये या भावाने विकला गेला आहे. सुपर कांदा ८० ते १०० रुपये, गुलटी कांदा ४० ते ६० रुपये तर बदला कांदा १० ते ३० रुपये अशा प्रतवारीनुसार कांद्याला दहा किलोस बाजारभाव मिळाला आहे. कांद्याच्या बाजारभाव वाढ होत असल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण दिसून येत आहे. मंचर बाजार समितीत आंबेगाव तालुक्याबरोबरच खेड व शिरूर तालुक्यातूनही कांद्याची आवक झाली. आगामी काळात बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे.