वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने वीजग्राहक त्रस्त

वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने वीजग्राहक त्रस्त

मंचर, ता. ११ : आंबेगाव तालुक्यात ५० वर्षांपूर्वी महावितरण कंपनीने उभारलेले विजेचे खांब, रोहित्र, जोडलेल्या वाहिन्या, फ्यूज पेट्या, जीर्ण झाल्या आहेत. उन्हाळ्याच्या दिवसांत होणारे वादळी वारे व पावसामुळे वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने वीज ग्राहक त्रस्त झाले आहेत.
आंबेगाव तालुक्यात एकूण १०३ ग्रामपंचायती व मंचर नगरपंचायत आहे. ३५ वर्षांपूर्वी फक्त निरगुडसर व शेवाळवाडी-खानवस्ती ही दोनच वीज उपकेंद्र होती. पूर्वी भोसरी वीज उपकेंद्रातून आंबेगाव तालुक्यासाठी सुरुवातीला व त्यानंतर नारायणगाव वीज उपकेंद्रातून वीजपुरवठा केला जात होता. दिवसेंदिवस वीज ग्राहकांची संख्या वाढत गेली. २००६ मध्ये ऊर्जामंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर दिलीप वळसे पाटील यांनी काठापूर, पिंपळगाव येथे अनुक्रमे २२० व १३२ केव्ही उच्च क्षमता असलेली वीज उपकेंद्रे उभारली. तसेच एकूण १६ वीज उपकेंद्र सध्या कार्यरत आहेत पण सध्यस्थितीत जवळपास १५ टक्के विजेचे खांब, वाहिन्या, रोहित्र, फ्यूज पेट्यांची दुरवस्था झाली आहे. अवसरी खुर्द, पिंपळगाव, वडगाव काशिंबेग, सातगाव पठार, नारोडी, गावडेवाडी, निरगुडसर, जवळे, डिंभे, रांजणी, महाळुंगे पडवळ, लोणी, लाखणगाव, बोरघर, तळेघर, कोंडवळ आदी जवळपास ४० गावे व वाड्यावस्त्यावर असलेल्या रोहित्रांवर वेलींचा विळखा असून झाडाच्या फांद्या पसरल्या आहेत. या ठिकाणची यंत्रणा बदलून तिथे नवीन यंत्रणा बसवण्याची गरज आहे. उघड्या फ्यूज पेट्यांमुळे लहान मुले, जनावरे यांना धोका होऊ शकतो. अशी भीती भावडी येथील शेतकरी अशोक बाजारे यांनी व्यक्त केली.

‘‘सर्व व्यवस्था जीर्ण झाल्यामुळे वारंवार वीज पुरवठा खंडित होतो. त्यामुळे या परिसरातील ग्रामस्थांना रात्री त्रास सहन करावा लागत आहे. याची दखल घेऊन महावितरणने यामध्ये सुधारणा करावी.’’ अशी मागणी मंचर येथील माणिक संतोष गावडे यांनी केली.

विजेच्या वाहिन्या अनेक ठिकाणी लोंबकळत आहेत. वादळी पावसामुळे व वाहिन्यांमधील शॉर्टसर्किटमुळे ऊस पिकला आग लागण्याच्याही अनेक घटना घडल्या आहेत. पावसाळ्यापूर्वी दुरुस्तीची कामे होणे गरजेचे आहे.”
-शिवाजीराव ढोबळे, माजी संचालक भीमाशंकर सहकारी साखर कारखाना, (पारगाव तर्फे अवसरी बुद्रुक)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com