मोदींमुळे महिलांना ३३ टक्के आरक्षण

मोदींमुळे महिलांना ३३ टक्के आरक्षण

मंचर, ता. ११ : ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केल्यानुसार सन २०२६नंतर लोकसभेत व विधानसभेत महिलांना ३३ टक्के आरक्षण मिळणार आहे. त्यामुळे अनेक महिलांना आमदार व खासदार होण्याची संधी आहे. राज्यात सत्तेवर असलेल्या महायुती सरकारने अंगणवाडी सेविका व आशा सेविका यांना स्मार्ट मोबाईल दिले आहेत. त्याचप्रमाणे त्यांचा पायी फिरतीचा प्रवास सुलभ हवा म्हणून त्यांना दुचाकी द्यावी, या मागणीचा पाठपुरावा राज्य शासनाकडे करणार आहे,’’ अशी ग्वाही विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिली.
मंचर (ता. आंबेगाव) येथे शनिवारी (ता. ११) शिरूर लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचाराच्या सांगताप्रसंगी महिला मेळाव्यात गोऱ्हे बोलत होत्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर, किरण वळसे पाटील, कल्पना आढळराव पाटील, प्रीती शहा, पक्षाच्या निरीक्षक उज्ज्वला शेवाळे, सुषमा शिंदे, उषा कानडे, माणिक गावडे, सुषमा गिरे, मनीषा वळसे पाटील, ज्योती निघोट, निर्मला नवले पाटील, माया देठे आदी उपस्थित होत्या.
गोऱ्हे म्हणाल्या, ‘‘खासदार नसतानाही आढळराव पाटील यांनी मतदारसंघासाठी एक हजार ५३२ कोटी ८७ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. तर, डॉ. कोल्हे यांचा ८० टक्के खासदार निधी खर्च न केल्यामुळे परत गेला. आढळराव पाटील यांना दिलीप वळसे पाटील, अजितदादा पवार यांची साथ मिळणार आहे. त्यामुळे शिरूर मतदारसंघ विकास कामात अग्रेसर राहणार.’’
‘‘डॉ. अमोल कोल्हे यांच्याकडे बोलण्यासारखा मुद्दा नसल्याने ते डायलॉगबाजी करतात. येथील जनतेला अभिनेता नको तर आढळराव पाटील यांच्यासारखा नेता पाहिजे,’’ असे रुपाली चाकणकर म्हणाल्या. तसेच, ‘वढू बुद्रुक, तुळापूर येथील संभाजी महाराज यांच्या स्मारकासाठी तेरा वर्षांत अजितदादा पवार यांनी निधी दिला नाही,’ असा आरोप कोल्हे यांनी केला आहे. याबाबत त्यांनी २१ जून २०२३ रोजीचा कोल्हे यांचा व्हिडिओ यावेळी सादर केला. त्यामध्ये अजित पवार यांनी भरघोस निधी दिला म्हणूनच संभाजी महाराज यांच्या स्मारकाचे काम सुरू आहे, असे डॉ. कोल्हे सांगत आहेत.
दरम्यान, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी चित्रफितीद्वारे मार्गदर्शन केले. ते म्हणाले, ‘‘देशामध्ये स्थिर व प्रगतशील सरकार आणण्यासाठी व आपल्या भागातील प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीकोनातून आढळराव पाटील यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा.’’

नागापूर येथे भिल्ल समाजाच्या शेतमजुराने केलेली आत्महत्या, त्याच कुटुंबातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला. याप्रकरणी अजून सहभाग असलेल्यांचा शोध पोलिसांनी घ्यावा. लवकरच मी नागापूर येथे भेट देऊन अन्यायग्रस्त मुलीला आधार देणार आहे.
- रूपाली चाकणकर, प्रदेशाध्यक्षा, राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com