यंत्रणा वरचढ ठरणार की,
शेतकऱ्यांमधील नाराजी!

यंत्रणा वरचढ ठरणार की, शेतकऱ्यांमधील नाराजी!

डी. के. वळसे पाटील : सकाळ वृत्तसेवा

मंचर, ता. १४ : शिरूर लोकसभा मतदारसंघातील सर्वात महत्त्वाचा मतदारसंघ म्हणून आंबेगाव विधानसभा मतदारसंघाची ओळख आहे. सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील व शिवाजीराव आढळराव पाटील यांचा या मतदारसंघावर प्रभाव आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या झालेल्या सभा व वळसे पाटील यांनी मोबाईलद्वारे राबवलेल्या प्रभावी प्रचार यंत्रणेमुळे बऱ्याच प्रमाणात वातावरण फिरले. त्याचा फायदा आढळराव यांना मताधिक्य मिळण्यासाठी होईल, असा दावा महायुतीच्या कार्यकर्त्याकडून केला जात आहे. डॉ. अमोल कोल्हे यांच्याकडे ठेकेदार व कार्यकर्त्यापेक्षा सामान्य जनताबरोबर होती. ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा प्रभाव व मानणारा वर्ग आहे. त्यामुळे डॉ. कोल्हे यांनाच मताधिक्य मिळेल, असा विश्वास महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे.
आंबेगावात सन २००४ पासून २०१४ पर्यंत प्रत्येक लोकसभा निवडणुकीत आढळराव पाटील यांना मताधिक्य मिळाले आहे. मात्र, सन २०१९ मध्ये डॉ. अमोल कोल्हे यांना मताधिक्य मिळाले होते. त्यावेळी त्यांच्यावर वळसे पाटील यांचा वरदहस्त होता. यावेळी वळसे पाटील यांनी आढळराव पाटील यांना साथ दिली आहे. निवडणूक आचारसंहिता लागण्यापूर्वी मंचर येथे ज्येष्ठ नेते शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार रोहित पवार यांची जाहीर सभा झाली. तोपर्यंत आढळराव यांची उमेदवारी जाहीर झाली नव्हती. तुतारीची हवा होती, पण निवडणुकीच्या कालावधीत खासदार सुप्रिया सुळे यांचा अपवाद वगळता कोल्हे यांच्यासाठी अन्य मोठ्या नेत्यांची जाहीर सभा झाली नाही. तसेच, एका स्थानिक नेत्याने संपूर्ण प्रचार काळात एकदाही आढळराव पाटील यांच्यावर हल्लाबोल केला नाही. त्यांच्याबरोबर असलेल्या एका उद्योजकाने आढळराव पाटील यांचा उघडपणे प्रचार केला.
अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, रूपाली चाकणकर, डॉ. नीलम गोऱ्हे, बाबा सिद्दिकी आदी नेत्यांच्या आढळराव यांसाठी झालेल्या सभा, गाव वाड्यावस्त्यावर बैठकांचा जोर लावला. विशेषत: मुस्लीम व अन्य जाती जमातीच्या बैठका व संपर्क मोहीम राबविली. मतदानाच्या दिवशी घराबाहेर मतदारांना काढून मतदान केंद्रापर्यंत नेण्याची व त्यांची बडदास्त ठेवल्याची चर्चा आहे.
महागाई, कांदा व दुधाचे बाजारभाव, याविषयी शेतकरी वर्गात असलेल्या रागाकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही. या महाविकास आघाडीच्या दृष्टीने जमेच्या बाजू डॉ. कोल्हे यांना मताधिक्य मिळवून देतील, असा महाविकास आघाडी कार्यकर्त्यांचा दावा आहे. तर, प्रत्येक गावात माहायुती कार्यकर्त्यांचे बळ, ग्रामपंचायत, सोसायट्या, पतसंस्था, बँका, भीमाशंकर कारखाना, बाजार समिती आदी शक्तिस्थाने व सतत संपर्क या जमेच्या बाजू आढळराव पाटील यांना मताधिक्य मिळवून देतील, असा विश्वास महायुतीचे कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.
गेल्या निवडणुकीत ६९.७ टक्के मतदान झाले होते. यावेळी ६२.९५ टक्के मतदान झाले आहे. उन्हाची वाढलेली तीव्रता, लग्नसराई, शनिवार (ता. ११) ते सोमवार (ता. १३) सलग आलेल्या सुट्ट्यामुळे मतदानात ६.१५ टक्के घट झाली आहे. सामान्य जनता मात्र निकालाविषयी स्पष्टपणे बोलत नाही.

नेत्यांची नाव, गावात झालेले मतदान व २०१९ मध्ये झालेले मतदान कंसात
दिलीप वळसे पाटील- निरगुडसर- ६८ टक्के (७० टक्के)
देवेंद्र शहा, सुनील बाणखेले- मंचर ६१ टक्के (६८ टक्के)
शिवाजीराव आढळराव पाटील- लांडेवाडी ७२ टक्के (६८ टक्के)
देवदत्त निकम- नागापूर- ७४ टक्के (७४ टक्के)
पोपटराव गावडे- टाकळी हाजी- ६९ टक्के (६७ टक्के)
सूर्यकांत पलांडे, जयश्री पलांडे- मुखई ६२ टक्के (६३ टक्के)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com