मंचर नगरपंचायतीत इच्छुकांची कोंडी

मंचर नगरपंचायतीत इच्छुकांची कोंडी

Published on

मंचर, ता. ८ : पुणे जिल्ह्यात बारामतीपाठोपाठ अत्यंत महत्त्वाचे राजकीय केंद्र असलेल्या आंबेगाव तालुक्यातील मंचर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष पद इतर नागरिकांचा मागास प्रवर्गातील (ओ.बी.सी.) महिलेसाठी राखीव झाले आहे. प्रभाग रचनेतही १७ पैकी ९ जागा महिलांसाठी राखीव आहेत. त्यामुळे गेली सहा महिने तयारी करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या तयारीवर पाणी पडले आहे.
गेली चार वर्षे मंचर नगरपंचायतीवर प्रशासकीय राजवट आहे. गेल्या तीन वर्षांत राज्य शासन व जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून १२५ कोटी रुपये विकासकामांसाठी निधी आला आहे. यापूर्वी सरपंच व ग्रामपंचायत सदस्य पदावर काम केलेले अनेक जण नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत होते. त्यांनी निवडणुकीची जय्यत तयारी केली होती. जोरदार संपर्क मोहीम हाती घेतली होती. लग्न, साखरपुडा-टिळा, वाढदिवस व दशक्रिया विधीला हजेरी लावण्याचे प्रमाण वाढले होते. पण आरक्षणामध्ये नगराध्यक्ष पद ओ.बी.सी. महिलेसाठी राखीव झाल्याने नगराध्यक्षपदाचे स्वप्न पाहणारे नेते व त्यांच्या समर्थकांचे स्वप्न भंगले असले तरी त्यांनी आपल्या पत्नीला निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याची तयारी सुरू केली आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस, भाजप व शिवसेना या महायुतीतील तिन्ही पक्षांची निवडणुकीसंदर्भात अजून एकत्रित बैठक झालेली नाही. शिवसेना महायुतीत सहभागी होणार, की स्वबळावर लढणार, यावर बरेच काही अवलंबून आहे. महाविकास आघाडीतील शरदचंद्र पवार राष्ट्रवादी कॉंग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष व कॉंग्रेस पक्षात आघाडी होण्यासाठी हालचाली सुरू असून, महायुतीतील एका पक्षाबरोबरही महाविकास आघाडीचे काही तालुका स्तरावरील नेते संपर्क करीत असल्याचीही चर्चा सुरू आहे.

निवडणूक अटीतटीची करण्यासाठी...
मंचर ग्रामपंचायतीवर माजी खासदार (स्व) किसनराव बाणखेले यांचे एकतर्फी वर्चस्व होते. स्वतः किसनराव बाणखेले, पुतण्या (स्व) प्रल्हाद यांनी सरपंच पद, नातू युवराज यांनी उपसरपंच पद, मुलगा (स्व) कैलास, सून वंदना यांनी ग्रामपंचायत सदस्य पद भूषविले आहे. मंचर ग्रामपंचायतीचे राजकारण बाणखेले कुटुंबासभोवतीच फिरत होते. ते सांगतील तोच सरपंच २००८ पर्यंत झालेला आहे. त्यानंतर झालेल्या सर्व निवडणुका माजी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्येच अटीतटीच्या झाल्या आहेत. सद्यःस्थितीत हे दोन्ही नेते एकत्र राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात आहेत. पण या नेत्यांसमोर आव्हान उभे करून मंचर नगरपंचायत निवडणूक अटीतटीची करण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही मोर्चेबांधणी सुरू केली आहे.


दृष्टिक्षेपात :
• सद्यःस्थितीत मतदारांची एकूण संख्या १७ हजार ३८४
• पुरुष : आठ हजार ६६५
• महिला : आठ हजार ७१८
• अन्य : १

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com