मंचर परिसरात २० बिबट्यांचा वावर

मंचर परिसरात २० बिबट्यांचा वावर

Published on

मंचर, ता. ६ : मंचर नगरपंचायतीच्या दक्षिण बाजूला अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर नर-मादी व तीन बछडे असा पाच बिबट्यांचा कळप दिसल्याने परिसरात पुन्हा दहशत पसरली आहे. शेतीची नांगरट करणारे प्रदीप व ओम थोरात यांना बुधवारी (ता.५) रात्री सातच्या सुमारास बिबटे दिसले. तत्काळ किरण थोरात व इतर शेतकऱ्यांनी आरडाओरडा करून त्यांना हुसकावले. या भागात २० बिबट्यांचा वावर व दहशत वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
पेठ (ता.आंबेगाव) येथे एकूण सात पोल्ट्री शेड आहेत. सलग दोन दिवस बिबट्याने पोल्ट्री शेडवर बैठक मारल्याची घटना घडली असून, मालकांनी त्याचे चित्रीकरण केले आहे. मेलेल्या कोंबड्यांवर ताव मारण्यासाठी बिबट्या पोल्ट्रीजवळ येतो, अशी माहिती शिवाजीराव पवळे, शंकरराव पवळे, भरत पवळे, नरेंद्र पवळे व शिवाजी धुमाळ आदी पोल्ट्री व्यावसायिकांनी दिली. नागरिकांना अद्याप थेट इजा झाली नसली तरी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनखात्याने तातडीने पिंजरा लावावा, अशी त्यांची मागणी आहे.
मंचर शहर व सहा ते सात किलोमीटर परिसरातील गावांमध्ये किमान सात प्रौढ बिबटे व पाच बछड्यांचा वावर असल्याची माहिती मंचर वनपरिक्षेत्र कार्यालयाने दिली आहे. मात्र प्रत्यक्षात संख्या २० पेक्षा अधिक असल्याचा दावा नागरिकांचा आहे.

जर्सी गायीचा फडशा
श्री क्षेत्र वडगाव काशिंबेग, निघोटवाडी, लांडेवाडी परिसरात गेल्या आठवड्यात गाई–वासरे, शेळ्या व श्वानांवर झालेल्या हल्ल्यांच्या मालिकेमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भावडी येथे उषा नवले यांच्या जर्सी गायीचा बिबट्याने फडशा पाडला. वनखात्याने पंचनामा केला आहे.


मंचर, भिलवाडी, पेठ, वडगाव काशिंबेग, लांडेवाडी व निघोटवाडी या भागात सात पिंजरे लावले आहेत. आदर्शगाव गावडेवाडी येथे बिबट शीघ्र कृती दलाचे सात सदस्य व २० कर्मचारी रात्री गस्त घालून नागरिकांना सतर्क करत आहेत. विशेषतः लहान मुले, महिला व शेतात काम करणाऱ्यांनी काळजी घ्यावी.
- विकास भोसले, मंचर वनपरिक्षेत्र अधिकारी

14508

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com