अवसरी आरोग्य केंद्राचे काम सुरळीत
डी. के. वळसे पाटील
मंचर : अवसरी खुर्द (ता.आंबेगाव) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कामकाज सुरळीत सुरू असल्याचे दिसून आले. रुग्ण नावनोंदणी करत होते. तर काही रुग्णांची तपासणी वैद्यकीय अधिकारी डॉ. रेश्मा बचुटे-शिंदे करत होत्या. तथापि, “खोकल्याच्या औषधांचा तुटवडा असल्याची खंत काही रुग्णांनी व्यक्त केली. डॉक्टर, परिचारिका व कर्मचारी वेळेवर हजर असतात. रुग्णांशी सौजन्याने वागतात.” अशी माहिती रुग्ण किसन शिंदे, किसन टेमकर ( दोघे रा. अवसरी खुर्द) यांनी दिली.
आरोग्य केंद्राच्या नव्या इमारतीबाबतही काही प्रश्न उपस्थित झाले. चार वर्षांपूर्वी पुणे जिल्हा परिषदेने बांधलेली आठ हजार चौरस फुटांची इमारत अद्याप रंगविण्यात आलेली नाही. इमारतीसमोरील प्रवेशद्वाराजवळ पाण्याची डबकी साचल्याने मच्छरांचा त्रास कायम असल्याची तक्रार मुक्कामी राहणाऱ्या रुग्णांना व कर्मचाऱ्यांना केली. या ठिकाणी पेव्हिंग ब्लॉक बसविल्यास स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लागू शकेल. अशी सूचना स्थानिकांनी केली. दररोज १०० पेक्षा अधिक रुग्ण उपचारासाठी केंद्रात येतात. दरमहा आठ ते दहा महिलांच्या प्रसूती, तसेच कुटुंब नियोजनाच्या १० ते १५ शस्त्रक्रिया येथे केल्या जातात. सर्पदंश, श्वानदंश व बिबट्याच्या चाव्यांच्या घटनांवर आवश्यक प्रतिबंधक लस व औषधसाठा उपलब्ध असल्याची माहिती डॉ. बचुटे व डॉ. याज्ञिक रणखांब यांनी दिली. येथे आळीपाळीने डॉक्टर व अन्य कर्मचारी थांबतात त्यामुळे २४ तास सेवा मिळते. आरोग्य केंद्राच्या आवारात डॉक्टर, परिचारिका व अन्य कर्मचाऱ्यांसाठी निवास इमारत बांधकाम अद्याप झाले नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांना अन्य ठिकाणी राहावे लागते.
एकूण जागा १७, रिक्त एक
वैद्यकीय अधिकारी : दोन
औषध निर्माण अधिकारी : एक
प्रयोग शाळा तंत्रज्ञ : दोन
आरोग्य साहाय्यक : एक
आरोग्य सहाय्यिका : एक
परिचर : चार
सफाई कामगार : एक
आरोग्य सेविका : एक
वाहन चालक : एक
एन.एच.एम : दोन
लेखनिक : जागा रिक्त एक
दृष्टिक्षेपात :
लोकसंख्या ३७ हजार ३५६.
उपकेंद्र : अवसरी खुर्द, गावडेवाडी, मंचर १, मंचर २
गावे : अवसरी खुर्द, खडकमाळ, शिंदेमळा, वायाळमळा, शेवाळवाडी, मंचर, गावडेवाडी.
4518

