बटाटा पिकातील अपयशावर मेथीची फुंकर

बटाटा पिकातील अपयशावर मेथीची फुंकर

Published on

मंचर, ता. २० : आदर्शगाव कुरवंडी (ता. आंबेगाव) येथील शेतकरी शंकर विठ्ठल बेंगडे व स्वाती बेंगडे या दांपत्याने आपल्या मेहनतीने व योग्य निर्णयामुळे शेतीत घेतलेल्या बटाटा पिकात अपयशाला यशात बदलून दाखवले आहे. त्यांनी मेथी पिकातून एकरी एका महिन्यात एक लाख ५० हजार रुपये नफा मिळवला आहे.
बेंगडे कुटुंबाने तीन हजार ४०० रुपये प्रती क्विंटल बाजारभावाने ८५० किलो एफसी- वन जातीचे बटाटा वाण खरेदी केला. शेतीची मशागत करून १५ जून २०२५ रोजी एक एकर क्षेत्रात बटाट्याची लागवड केली. वेळोवेळी कीड प्रतिबंधक औषधांची फवारणी, पिकांची जोमदार वाढ होण्यासाठी खतांची वापर केला. त्यामधून पाच टन ४०० किलो उत्पादन अपेक्षित होते. मात्र, जुलै, ऑगस्ट व १५ सप्टेंबरपर्यंत जवळपास दररोज पाऊस पडत होता. त्यामुळे ३० पिशव्यांतील बटाटा सडून गेला. बाजारपेठेत विक्रीसाठी ६० बटाटा पिशव्या (प्रति पिशवी वजन अंदाजे ५५ ते ६० किलो) पाठवल्या. प्रती किलोला १४ रुपये बाजारभाव मिळाला. एकूण ४९ हजार रुपये रक्कम मिळाली. ठिबक, मजुरी, खते, फवारणी, काढणी, साठवण, बाजारपेठेपर्यंत वाहतूक असा, एकूण ५२ हजार रुपये खर्च झाला. तीन महिन्याच्या मेहनतीनंतर तीन हजार रुपये तोटा झाला आहे.
शेतकरी स्वाती बेंगडे यांनी सांगितले की, ‘‘बटाटा पिकाने तोटा झाल्याने आम्ही खचून गेलो होतो. पण सासरे विठ्ठल बेंगडे, सासू सीताबाई व दीर अमोल यांनी धीर दिला व त्याच जमिनीत मेथी पीक घेण्याविषयी मार्गदर्शन केले. त्यानुसार १३० रुपये प्रती किलो बाजारभावाने ४० किलो मेथीचे बियाणे खरेदी केले. त्याच एक एकर जमिनीत १६ ऑक्टोबर रोजी मेथीची पेरणी केली. कीड व अळीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून वेळोवेळी औषधांच्या फवारण्या केल्या, खतांचा डोस दिला. त्यामधून एकूण सहा हजार मेथीच्या जुड्यांचे उत्पादन निघाले. मेथीची नारायणगाव बाजार समितीच्या आवारात विक्री केली. प्रती जुडी ३० रुपये बाजारभाव मिळाला. बटाट्यात तोटा झाला पण मेथीने कुटुंबाला आधार दिला.’’

दृष्टीक्षेपात मेथी पीक
बियाणे- ४० किलो (दर १३० रुपये), खर्च ५२०० रुपये
एकरी एकूण खर्च- ३० हजार रुपये
उत्पादन- सहा हजार जुड्या
बाजारभाव - प्रति जुडीला ३० रुपये
एकूण उत्पन्न- एक लाख ८० हजार रुपये
नफा- एक लाख ५० हजार रुपये नफा
पीक कालावधी - ३० दिवस.

दृष्टीक्षेपात बटाटा पीक
बियाणे खरेदी- ८५० किलो (दर तीन हजार ४०० रुपये प्रती १०० किलो)
एकूण खर्च- ५२ हजार रुपये
उत्पन्न - तीन हजार ५०० किलो
बाजारभाव - प्रती किलो १४ रुपये प्रमाणे ४९ हजार रुपये
तोटा - तीन हजार रुपये

एका पिकात तोटा झाला की शेतकरी खचून जातात. पण हवामानाचा अंदाज, बाजारपेठेची माहिती व योग्य नियोजन केल्यास तोटा नफ्यात बदलू शकतो. बटाटा लावताना सतत पावसाचा फटका बसला. पण मेथी पिकाने आम्हाला दिलासा दिला. बाजारपेठेचा अंदाज घेऊन पिके घेतली, तर नक्कीच शेती फायदेशीर ठरते.
-शंकर बेंगडे, प्रगत शेतकरी

14599

Marathi News Esakal
www.esakal.com