मंचरमध्ये होणार अटीतटीची, रंगतदार निवडणूक

मंचरमध्ये होणार अटीतटीची, रंगतदार निवडणूक

Published on

मंचर, ता.२२ : मंचर नगरपंचायतीची प्रथमच निवडणूक होत आहे. गेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात असलेले सध्या गळ्यात गळा घालून फिरत आहेत तर एकमेकांच्या हातात हात घालून प्रचार करणारे एकमेकांवर हातवारे करत आहेत. हे वेगळेपण या निवडणुकीत पाहावयास मिळते. महायुती व महाविकास आघाडीतही फूट पडली आहे. या निवडणुकीसाठी १६ जागांसाठी ६७ उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे येथील निवडणूक अटीतटीची व रंगतदार होणार आहे.
- डी. के. वळसे पाटील

मंचर ग्रामपंचायत यापूर्वी झालेल्या निवडणुकीसाठी माजी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील व म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये सलग तीन पंचवार्षिक निवडणुकांमध्ये अटीतटीच लढती झाल्या होत्या. हे दोन नेते एकत्र आल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची बाजू मजबूत झाली आहे. पण या दोन्ही नेत्यांचे शिष्य राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब बाणखेले, मंचरचे माजी सरपंच शिवसेनेचे दत्ता गांजाळे व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे राजाराम बाणखेले यांनी दंड थोपटले आहेत. शिवसेना स्वतंत्र निवडणूक लढवत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप यांच्यायुतीचे नेतृत्व शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे व भाजपचे नेते प्रमोद बाणखेले, काँग्रेस व आप युतीचे नेतृत्व राजू इनामदार करत आहेत. मोनिका बाणखेले (राष्ट्रवादी काँग्रेस), राजश्री गांजाळे (शिवसेना), रजनीगंधा बाणखेले (ठाकरे शिवसेना), फर्जीन मुलाणी (काँग्रेस), प्राची थोरात (अपक्ष) व जागृती महाजन (अपक्ष) नगराध्यक्षपदाच्या निवडणूक रिंगणात आहेत. माजी खासदार (स्व.) किसनराव बाणखेले यांची सून वंदना यांची प्रभाग एकमधून बिनविरोध निवड झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. गेली दोन वर्षे तयारी करणारे भाजपचे संजय थोरात यांची सून प्राची यांना पक्षाने उमेदवारी नाकारल्याने थोरात व त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी पसरली आहे.
वळसे पाटील व आढळराव पाटील यांच्या माध्यमातून मंचर नगरपंचायतीच्या विविध विकास कामांसाठी १३५ कोटी रुपये निधी आला. अनेक विकासकामे पूर्ण झाली असून काही कामे सुरू आहेत. या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली हुतात्मा बाबू गेनू जलाशयातून उताराने १३६ कोटी रुपये खर्चाची नळपाणी पुरवठा योजना राबविण्याचा व २४ तास मंचरकरांना पाणी मिळेल. असा प्रचाराचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपने केला आहे. नगर विकास खाते शिवसेनेचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. शिवसेनेने यापूर्वी मंचरसाठी केलेले काम सर्वांसमोर आहे. तसेच शिवसेनेला संधी मिळाल्यास भष्ट्राचारमुक्त काम करू असा प्रचार शिवसेनेने सुरू केला आहे.
महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी यापूर्वी मंचर ग्रामपंचायतीत झालेला गैरव्यवहार व यापुढे पारदर्शक कामकाज उच्च शिक्षित तरुणींच्या हातात नगरपंचायतीची सूत्र व स्वाभिमानी मंचर या मुद्द्यावर भर दिला आहे.


मंचर ग्रामपंचायत निवडणूक मागील पक्षीय बलाबल -
राष्ट्रवादी काँग्रेस : ६
(स्व) किसनराव बाणखेले : २
शिवसेना : ७
बजरंग दल : २
सरपंच : दत्ता गांजाळे (शिवसेना)


शहरातील प्रमुख प्रश्न -
सावर्जनिक स्वच्छतागृहांची अपुरी संख्या
पार्किंग व्यवस्था नाही.
छत्रपती शिवाजी महाराज व लक्ष्मी रस्ता मार्गावर होणारी वाहतूक कोंडी.
पोलिस चौकीचा अभाव.


प्रचारातील मुख्य मुद्दे
नियमित व शुध्द पाणीपुरवठा.
स्वच्छ व सुंदर शहर

अल्प उत्पन्न गटातील कुटुंबांसाठी घरकुल योजना.
अपघातग्रस्तांसाठी अतिदक्षता रुग्णवाहिका.
अग्निशामक दल विभाग व यंत्रणा कार्यान्वित करणे.
सांडपाणी व्यवस्थापन.
व्यापारी संकुल उभारणे.

..............................................................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com