मानव-बिबट संघर्ष राज्य आपत्ती; १३ कोटींची मदत
मंचर, ता.२३ : “पुणे जिल्ह्यात बिबट हल्ल्यांमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले. पिंपरखेड येथे चिमुकल्यावर झालेल्या दुर्दैवी हल्ल्यानंतर काही ठिकाणी राजकीय हेतूने आंदोलनाचे वातावरण निर्माण झाले. जनतेची दिशाभूल केली. सरकारने या प्रश्नाला अत्यंत गांभीर्याने घेतले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत तातडीने आयोजित केलेल्या उच्चस्तरीय बैठकीत मानव-बिबट संघर्षाबाबत राज्य आपत्ती म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेण्यात आला. उपाययोजनांसाठी तातडीने १३ कोटी रुपये निधी वनखात्यासाठी मंजूर केला.” असे माजी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.
आदर्शगाव गावडेवाडी-अवसरी बुद्रूक (ता.आंबेगाव) येथे घोड वन विभागाच्या वतीने पाच कोटी ३४ लाख रुपये खर्च करून उभारण्यात येणाऱ्या वन उद्यानाचे भूमिपूजन वळसे पाटील यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील होते. यावेळी देवेंद्र शहा, विष्णू हिंगे, सरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते. वळसे पाटील म्हणाले,“बिबट समस्येबाबत उपाययोजनांसाठी माझा पाठपुरावा सुरू आहे. सरकारने बिबट समस्येला प्राधान्यक्रम दिला असून नागरिक सुरक्षिततेसाठी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सर्व उपाययोजना युद्धपातळीवर सुरू आहेत. वनखात्याच्या अधिकाऱ्यांना अडचण आल्यास प्रोटोकॉल न पाळता मध्यरात्री मला फोन केला तरीही चालेल. त्यांनी निर्भयपणे काम करून जनतेला दिलासा द्यावा.” आढळराव पाटील म्हणाले, “काम कोण करते व राजकारण कोण करते. हे जनतेला माहीत आहे. बिबट समस्या निवारणाबाबत वळसे पाटील यांनी राज्यशासनाकडे केलेला पाठपुरावा कौतुकास्पद आहे.” मंचरचे वनपरिक्षेत्र अधिकारी विकास भोसले यांनी आभार मानले.
वन्यप्राण्यांचा नाहीसा झालेला मूळ आदिवासी पुनर्जीवित करण्याच्या दृष्टीने कामकाज सुरू केले आहे. येथे ५.३ हेक्टर क्षेत्रात उद्यान उभे केले जाणार आहे. पर्यावरण, वन्यजीव संरक्षण व नागरिकांचे सुरक्षित सहअस्तित्वासाठी उद्यान महत्त्वाचे आहे. बिबट्यांच्या हालचालींना वैज्ञानिक दिशा मिळून मानववस्तीत प्रवेशाची शक्यता कमी होईल. ट्रॅप कॅमेरे, रेस्क्यू पथके, जनजागृती मोहिमा यांसारख्या उपाययोजनांवर काम करत आहे. उद्यान विद्यार्थ्यांसाठी आदर्श केंद्र ठरेल.
- प्रशांत खाडे, उपवनसंरक्षक,जुन्नर वनविभाग
लोकांच्या सुरक्षेसाठी मंत्रालयात निर्णय घेत असताना. विरोधकांनी मुद्दाम पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर अडथळे निर्माण करून नागरिकांची गैरसोय केली. लोकांच्या भावनांना चिथावणी देण्याचा हा प्रयत्न अत्यंत दुर्दैवी आहे.
-दिलीप वळसे पाटील, माजी सहकारमंत्री
4627
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

