पेठ परिसरात पशुवैद्यकीय सेवेचा बोजवारा
डी. के. वळसे पाटील : सकाळ वृत्तसेवा
मंचर, ता.२५ : पेठ (ता.आंबेगाव) येथे पेठ, पारगावतर्फे खेड, कारेगाव, भावडी व श्रीरामनगर आदी पाच गावांतील शेतकऱ्यांच्या पशुधनाला उपचारासाठी जादा पैसे देऊन खासगी पशुवैद्यकीयांकडे धाव घ्यावी लागते. आठवड्यातून दोनच दिवस पशुवैद्यकीय परीवेक्षक हजेरी लावतात. दवाखान्यातील कामकाज रामभरोसे असल्याने पशुवैद्यकीय सेवेचा बोजवारा उडाल्याने पशुपालक त्रस्त झाले आहेत. सध्या शेतकऱ्यांत पशुवैद्यकीय सेवेबाबत प्रचंड नाराजी आहे. पूर्णवेळ पशुवैद्यकीय अधिकारी कधी नियुक्त होणार? असा सवाल संतप्त पशुपालक करीत आहेत.
राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाने जानेवारी २०२५ मध्ये इमारतीची डागडुजी करून पत्रे टाकून खोली तयार केली. प्रथमदर्शनी भागात रंगही दिला आहे. सध्या येथील पशुवैद्यकीय दवाखाना आठवड्यातील चार दिवस परिचरच चालवतात. परिचर चिमाजी बांबळे यांना लसीकरण करण्याशिवाय कोणतेही अधिकार नाही. येथील कामकाज रामभरोसे आहे, असे शेतकरी पांडुरंग तळेकर व अशोक धुमाळ यांनी सांगितले.
बियाणे वाटप केले जात नसल्याने हिरवा व वाळलेला चारा सुविधा शेतकऱ्यांना मिळत नाही. ‘असून अडचण, नसून खोळंबा’ अशी येथील दवाखान्याची अवस्था आहे, असे शेतकरी अशोक राक्षे, सोपान काळे यांनी सांगितले.
पशुवैद्यकीय दवाखान्याची अद्ययावत नवीन इमारतीचे बांधकाम करावे. राज्य शासनाऐवजी पुणे जिल्हा परिषदेने येथे पूर्णवेळ डॉक्टरची नियुक्ती करावी. जनावरांसाठी वेळोवेळी तपासणी शिबिराचे आयोजन करावे.
- संदीप पवार, पशुपालक
नोव्हेंबर २०२४ ते मार्च २०२५
परिसरातील पशुधन
गाय, बैल...........३ हजार १२
शेळ्या.......... १ हजार ९१
म्हैस........३५२
घोडे........५
यांची आहे गरज
- सुविधांचा अभाव
- पाण्याची व्यवस्था
- स्वच्छतागृह
- रेबीज लसीचा साठा
- पुरेसा औषधसाठा
राज्य शासनाचा पेठ येथील पशुवैद्यकीय दवाखान्याचे जिल्हा परिषदेमध्ये एकत्रीकरण झाले आहे. पण आर्थिक व्यवहार व पदावर नियंत्रण राज्य शासनाकडेच आहे. स्वच्छतागृह व पाण्याची कुठलीही सुविधा नाही. माझ्याकडे वाफगाव, राजगुरुनगर (ता.खेड) व पेठ या तीन पशुवैद्यकीय दवाखान्यांचा अधिभार आहे. त्यामुळे प्रत्येक दवाखान्यासाठी आठवड्यातील दोन दिवस हजर राहते.
-रेणुका काळे, पशुधन परीवेक्षक, पेठ (ता.आंबेगाव)
लसीकरण
लाळ्या खुरकूत.......२,९३०
लंपी.......२०५०
आंत्रविषार (भूळकांडी) प्रतिबंधक........... १०००
घटसर्प.......७००
फऱ्या.......१००
ता.१ एप्रिल ते १५ नोव्हेंबर २०२५ पर्यंतची स्थिती
जंतरोग............४८०
गर्भ तपासणी............६१
उपचार............६०
कृत्रिम रेतन............३७
वंध्यत्व तपासणी............३५
लंपी रोग नोंद...........३०
दृष्टिक्षेपात दवाखाना
- वासरांच्या जन्माची नोंद उपलब्ध नाही.
- वैरण बियाण्यांचे शून्य वितरण
- पाणी क्षेत्र कमी असल्यामुळे हरित व सुक्या चाऱ्याचा पुरवठा नाही.
- राष्ट्रीय पशुधन मोहिमेत ऑनलाइन माहिती भरली जाते.
पेठ, पारगावतर्फे खेड, कारेगाव, भावडी व श्रीरामनगर गावांच्या कार्यक्षेत्र जवळपास १० हजारांपेक्षा अधिक दूध संकलन आहे. येथे गाय, शेळ्या-मेंढ्या, गीर गाई व म्हैस आदी पशुधन मोठ्या प्रमाणात आहे. पण गेल्या चार वर्षांपासून येथे पूर्ण वेळ डॉक्टर नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना खासगी डॉक्टरची मदत घेऊन त्यांना अधिक पैसे मोजावे लागतात. येथे पूर्ण वेळ डॉक्टर व मुबलक प्रमाणात औषधांचा साठा ठेवण्याची गरज आहे.
- बाबाजी ढमाले, माजी अध्यक्ष, वाकेश्वर सहकारी दूध संस्था पेठ (ता.आंबेगाव)
14631
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

