खेड घाटात एसटी चालकासह प्रवाशास मारहाण

खेड घाटात एसटी चालकासह प्रवाशास मारहाण

Published on

मंचर, ता ५ : पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर खेड घाटात (ता. खेड) परळ ते साकोरी या एसटी बस चालक भरत पांडुरंग बुगदे व बसमधील एका प्रवाशास दुचाकीवरील दोन अज्ञात तरुणांनी शिवीगाळ करून लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची घटना गुरुवारी( ता.४ ) संध्याकाळी घडली आहे. या प्रसंगाचा व्हिडिओ प्रसार माध्यमावर व्हायरल झाल्याने गुंडगिरीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दरम्यान, या संदर्भात मंचर पोलिस ठाण्यात एसटीचे चालक भरत पांडुरंग बुगदे व वाहक अमित अरुण करपे यांनी प्राथमिक माहिती सादर केली होती. पण फिर्याद देण्यास नकार दिल्याची ही माहिती समोर आली आहे.
याबाबत राज्य परिवहन महामंडळाचेमंचर आगार व्यवस्थापक वसंत अरगडे यांनी सांगितले की ‘‘गुरुवारी परळ ते साकोरी एसटी बस (एम.एच १४ एल.एक्स ६०६५) बस खेड घाटातून मंचरच्या दिशेने जात होती. बसमध्ये १८ प्रवासी होते. थार चालक व बस चालकाची साइड देण्यावरून बाचाबाची झाली .त्यावेळी घटनास्थळी काही दुचाकीस्वार घटना पाहत होते. काही वेळानंतर थारचालक घेऊन निघून गेला. मात्र, थोड्या वेळात त्या ठिकाणी असलेल्या दुचाकी वरील दोन तरुणांनी एसटीचा दरवाजा उघडून बसमध्ये प्रवेश करून त्यांनी बसचालक बुगदे यांना अर्वाच्य शिवीगाळ करून लाकडी दांडक्याने मारहाण केली. बसमधील प्रवासी रफिक मोमीन यांनी भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांनाही मारहाण करण्यात आली. मंचर बस स्थानकावर एसटी आल्यानंतर तेथे वीस ते पंचवीस जणांच्या टोळक्याने बसमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर घाबरलेल्या चालकाने बस मंचर पोलिस ठाण्यात नेऊन या घटनेची माहिती दिली. एसटीमध्ये गुंडगिरीचा प्रकार पाहिल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. बस चालकास मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यामुळे दहशत निर्माण करणाऱ्या या तरुणांवर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. दरम्यान, घडलेल्या घटनेचा अहवाल विभाग नियंत्रक राज्य परिवहन महामंडळ पुणे यांच्याकडे पाठविण्यात आला आहे, असे ही अरगडे यांनी सांगितले.

मंचर पोलिस ठाण्यात या प्रकाराविषयी अद्याप कुठलीही तक्रार दाखल प्राप्त झाली नाही. हा वाद आपापसांत मिटवला गेल्याची माहिती आहे. राज्य परिवहन महामंडळाने पोलिसांकडे तक्रार दिल्यास नियमानुसार संबंधितांच्या विरोधात कारवाई केली जाईल.
- श्रीकांत कंकाळ, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, मंचर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com