मंचरजवळ सहलीच्या दोन बसचा अपघात

मंचरजवळ सहलीच्या दोन बसचा अपघात

Published on

मंचर, ता. ११ : संगमनेर (जि. अहिल्यानगर) येथील सह्याद्री ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या सहलीच्या पाच बसमधील एका बसची दुसऱ्या बसला गुरुवारी पहाटे (ता. ११) पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्गावर मंचरजवळील (ता. आंबेगाव) एकलहरे येथे मागून धडक बसली. या अपघातात २० विद्यार्थी व पाच शिक्षक जखमी झाले.
संगमनेर येथील सह्याद्री ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांची सहल एसटीच्या चार बसमधून कोकण दर्शनासाठी गेली होती. तेथून माघारी संगमनेरला जाताना बसच्या चालकाला पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी पहाटे एकलहरे येथे असलेला गतिरोधक लक्षात आला नाही. त्यामुळे त्याने अचानक बसची गती कमी झाली. त्यामुळे त्या बसला मागून आलेल्या एसटी बसची जोरदार धडक बसली. या अपघातात मागून आलेल्या बसच्या पुढील भागाच्या, तसेच समोर असलेल्या बसच्या सर्व काचा फुटून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच, २० विद्यार्थी व पाच शिक्षक जखमी झाले. त्यांच्यावर मंचर येथील खासगी रुग्णालयामध्ये उपचार करण्यात आले.
झोपेत असतानाच हा अपघात झाल्यामुळे विद्यार्थी व शिक्षक जखमी झाले. घाबरलेल्या विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात आरडाओरड ऐकून एकलहरे परिसरातील हॉटेल व्यावसायिक व ग्रामस्थ मदतीसाठी धावून आले. मंचर बसस्थानकाचे वाहतूक नियंत्रक मोहम्मद सय्यद, रुग्णवाहिका चालक अमित काटे यांनी सर्व जखमींना मंचर येथील दोन रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल केले. अरविंद वळसे पाटील, सुहास बाणखेले, पूजा वळसे पाटील यांनी रुग्णालयामध्ये विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांना उपचारासाठी मदत केली. अपघाताची माहिती समजल्यानंतर संगमनेरहून अनेक पालक व शिक्षण संस्थेचे पदाधिकारी रुग्णालयामध्ये दाखल झाले. दरम्यान सर्वांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. त्यांना संगमनेर येथे पाठविले, अशी माहिती मंचर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांनी दिली.

उड्डाणपुलाची गरज
एकलहरे येथे असलेल्या चौकात गेल्या पाच वर्षात दहा जणांचा मृत्यू झाला आहे. ‘मौत का कुआ’ अशीच या चौकाची ओळख झाली आहे. येथे उड्डाणपूल किंवा भूमिगत मार्ग व्हावा, या मागणीसाठी अनेकदा आंदोलने झाली होती, पण अद्याप उड्डाण पूल न झाल्याने अपघाताचे सत्र सुरूच आहे. याविषयी एकलहरे- कळंब नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने जखमीला प्रत्येकी एक हजार रुपयाची, अशी एकूण २५ हजार रुपयांची रोख तातडीची मदत दिली आहे. सर्व जखमी सुखरूप असून, त्यांना संगमनेर येथे सोडण्याची व्यवस्था मंचर आगाराच्या दोन एसटी बसद्वारे केली. अपघातात दोन्ही एसटी बसचे एकूण दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
- वसंत अरगडे, आगार प्रमुख, मंचर (ता. आंबेगाव)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com