पाणी असूनही ३५० कुटुंबे तहानलेली
डी. के. वळसे पाटील : सकाळ वृत्तसेवा
मंचर, ता. १७ : अवसरी खुर्द (ता.आंबेगाव) ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील अभंगमळा, खेडकरमळा, कौलीमळा व भट्टीवस्ती येथील सुमारे ३५० कुटुंबांना शुद्ध व पुरेशा प्रमाणात पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी केंद्र शासनाच्या हर घर जल योजनेअंतर्गत जलजीवन मिशन व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत एक कोटी ५ लाख ४२ हजार रुपयांच्या अंदाजपत्रकास जुलै २०२२ मध्ये मान्यता देण्यात आली होती. त्यानंतर ३ ऑगस्ट २०२२ रोजी प्रशासकीय मान्यता मिळून प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली. मात्र, या योजनेची अंतिम मुदत ६ मे २०२३ संपली असतानाही आज दोन वर्षे सात महिने उलटून गेले तरी काम अद्याप अपूर्ण आहे. सुधारित अंदाजपत्रकासाठी निधी उपलब्ध न झाल्याने काम रेंगाळले असून त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
अभंगमळा परिसरात शासकीय अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालय असल्याने सुमारे ५० वसतिगृहांमध्ये ४०० पेक्षा अधिक विद्यार्थी-विद्यार्थिनी वास्तव्यास आहेत. शिवाय अनेक इमारती व घरे बांधकामाच्या टप्प्यात असल्याने पिण्याच्या पाण्याची मागणी लक्षणीयरित्या वाढली आहे. नळ योजनेसाठी खोदण्यात आलेली विहीर तसेच शेजारील ओढ्यावर बांधलेला सिमेंट बंधारा सध्या पाण्याने तुडुंब भरलेला असतानाही नागरिकांना शुद्ध पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. योजनेचे काम तातडीने पूर्ण करून निधी उपलब्ध करून देण्यात यावा, अशी जोरदार मागणी परिसरातील नागरिक, विद्यार्थी व ग्रामस्थांकडून केली जात आहे.
काही वस्त्या पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहिल्या आहेत.त्यामुळे सुधारित वाहिन्यांची कामे,सोलर,शुद्ध पाणी यंत्रणा, वीजवाहिन्या जोड,महावितरण कंपनीकडे अनामत रक्कम भरण्यासाठी असे एकूण ६० लाख रुपयांचे सुधारित अंदाजपत्रक तांत्रिक मान्यतेसाठी पाणीपुरवठा विभाग,मंत्रालय मुंबई येथे पुणे जिल्हा परिषदेने सादर केले आहे. मंजुरी मिळाल्यानंतर ताबोडतोब काम सुरू होईल.
- विलास भंडारी, उपअभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, आंबेगाव तालुका पंचायत समिती
मी सरपंच पदावर कार्यरत असताना अभंगमळा योजनेचे अंदाजपत्रक तयार करण्याविषयी जलजीवन मिशनच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या. पण त्यांनी ग्रामपंचायतीला विश्वासात न घेता सर्वेक्षण केले.त्यामुळे अनेक कुटुंब पाण्यापासून वंचित राहणार आहेत.सध्याचे कनिष्ठ अभियंता एकनाथ दंदाले यांनी व्यवस्थित सर्वेक्षण करून मंजुरीसाठी प्रस्ताव पुणे जिल्हा परिषदेकडे पाठविले आहे. ग्रामस्थ उर्वरित कामाच्या प्रतीक्षेत आहे.
- जगदीश अभंग, माजी सरपंच, अवसरी खुर्द ग्रामपंचायत
योजनेची माहिती
निधी : एक कोटी ५ लाख ४२ हजार रुपये
कामाला सुरुवात : ऑगस्ट २०२२
काम पूर्ण करण्याचा कालावधी : ६ मे २०२३
कामाची सध्यस्थिती : पंप हाऊस, विहीर, विहिरीवर दोन प्रत्येकी साडेसात अश्व शक्तीचे पाणी पंप, ७६ हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी, सहा किलोमीटर लांबीची जलवाहिनी, विहिरीजवळ ओढ्यावर ३० मीटर लांब व चार मीटर उंच सिमेंट बंधारा बांधकाम पूर्ण
अपूर्ण काम : सुधारित वाहिन्यांची कामे, सोलर, शुद्ध पाणी यंत्रणा, वीजवाहिन्या जोड, महावितरण कंपनीकडे अनामत रक्कम एकूण ६० लाख रुपयांचे सुधारित अंदाजपत्रक मान्यतेसाठी प्रलंबित
या योजनेसाठी राज्य व केंद्र सरकार प्रत्येकी ५० टक्के निधी देणार होते पण केंद्र सरकारने निधी न दिल्याने व तांत्रिक अडचणी यामुळे ही कामे थांबले आहे. निधी मिळाल्यानंतर ताबडतोब काम केले जाईल.
- कैलास भोर, कामाचे ठेकेदार
4816
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

