बिबट्यासह आता कुत्र्यांचीही दहशत

बिबट्यासह आता कुत्र्यांचीही दहशत

Published on

मंचर, ता. २० : आंबेगाव तालुक्यात बिबट्याच्या दहशतीनंतर आता भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवाने नागरिकांची झोप उडाली असून, आदर्शगाव गावडेवाडी (ता. आंबेगाव) येथील पिंपळमळा परिसरात गुरुवारी (ता. १८) भटक्या कुत्र्याने सहा वर्षांच्या नेहा दादाभाऊ खंडागळे हिच्यावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. तीन महिलांनी प्रसंगावधान राखत धाडस दाखवून तिची सुटका केली. गंभीर जखमी नेहावर सध्या पिंपरी-चिंचवड येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
शेतात मोलमजुरी करणारे खंडागळे कुटुंब आहे. गुरुवारी अंगणवाडीतून नेहाचे चुलते राहुल खंडागळे यांच्यासमवेत नेहा घरी जात होती. रस्त्याच्या शेजारी असलेल्या विहिरीवर कृषी पंप सुरु करण्यासाठी राहुल थांबले. त्यावेळी नेहा शेताच्या बांधावर उभी असतानाच अनाहूतपणे आलेल्या भटक्या कुत्र्याने नेहावर हल्ला केला. तिच्या उजव्या हाताच्या दंडाला चावा घेतला. तिला फरपटत बाजूला नेण्याचाही प्रयत्न झाला. हा प्रकार पाहून शेतात कांदा लागवड करत असलेल्या महिला धावत मदतीसाठी आल्या त्यांनी आरडाओरड केला. कुत्र्याला पळून लावण्याचा प्रयत्न केला; पण कुत्रा नेहाला सोडत नव्हता. धाडस व प्रसंगावधान राखून संगीता पिंपळे, सविता शिंदे व संगीता गावडे यांनी नेहाला धरून तिची कुत्र्याच्या तावडीतून सुटका केली. नेहा रक्तबंबाळ झाली होती. तिला चार ठिकाणी चावा घेतला असून दंड मोडला आहे. घाबरल्याने नेहा काही वेळ बेशुद्ध पडली होती. प्रथम मंचर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर पुढील उपचारासाठी यशवंतराव चव्हाण रुग्णालयात नेण्यात आले. वेळेवर वैद्यकीय उपचार मिळाल्याने तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे, असे राहुल खंडागळे यांनी सांगितले.

बिबट्यांच्या दहशतीमुळे पालक व लहान मुले भयभीत आहेत. त्यातच भटक्या कुत्र्यांची भर पडली आहे. सध्या लग्नसराईचा हंगाम असल्याने उरलेले अन्न उघड्यावर टाकले जाते. त्यामुळे भटक्या कुत्र्यांचे प्रमाण वाढत चालले आहे. आंबेगाव तालुक्यात १०३ ग्रामपंचायती आहेत. प्रत्येक ग्रामपंचायतीने अशा दुर्घटना टाळण्यासाठी सर्वेक्षण करून भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा.
- अरविंद वळसे पाटील, भाजप नेते, आंबेगाव तालुका

4837

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com