महामार्गावरील कोंडीने विमान प्रवासी अडचणीत
मंचर, ता. ६ : मुंबई-अबुधाबी इंडिगो विमानाच्या वेळेवर निर्गमनाच्या नावाखाली ५० प्रवाशांना अवघ्या दहा मिनिटांसाठी बोर्डिंग न देता टेकऑफ केल्याचा प्रकार मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर घडला. त्यामुळे आंबेगाव, खेड व जुन्नर तालुक्यातील प्रवाशांचे आर्थिक नुकसान तर झालेच; शिवाय शारीरिक, मानसिक त्रासालाही सामोरे जावे लागले. पुणे-मुंबई महामार्गावर झालेल्या वाहतूक कोंडीचा फटका प्रवाशांना बसला आहे.
‘‘आमची कोणतीही चूक नसताना विमान थोड्या काळासाठी चुकले. याला जबाबदार कोण?’’ असा संतप्त प्रश्न चंद्रकांत बांगर, नंदा पडवळ या प्रवाशांनी केला आहे.
नेमके काय घडले?
बुधवारी (ता. ४) पहाटे ५.२५ ला मुंबई-अबुधाबी विमान होते. कोणताही धोका नको म्हणून प्रवासी गटाने मंगळवारी (ता. ३) दुपारी तीन वाजताच मंचर येथून मोशी मार्गे मुंबईकडे प्रवास सुरू केला. मात्र लोणावळ्याजवळ टँकर पलटी झाल्याने सात तास वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागले.
पर्याय म्हणून प्रवाशांनी खंडाळ्याहून यू-टर्न घेत लोणावळा गाठले. तेथून बुधवारी (ता. ४) रात्री १२.४० ची कोणार्क एक्सप्रेस पकडली. परंतु ट्रेन एक तास उशिरा सुटल्याने दादरऐवजी ठाण्याला उतरावे लागले. पहाटे साडेतीन वाजता रात्रीच्या वेळी टॅक्सीने मुंबई विमानतळ गाठले. परंतु विमानाचे उड्डाण झालेच. केवळ १० मिनिटांसाठी ५० जणांच्या गटाला थांबावे लागल्याची माहिती राजेंद्र शिंदे व नीलिमा बांगर यांनी दिली.
विमान चुकल्याच्या घटनेला जबाबदार कोण? महामार्गावरील अपघात व्यवस्थापन की रेल्वेचा उशीर? असा प्रश्न प्रवाशांना पडतो आहे. महामार्ग कोंडीची घटना लक्षात घेता विमानाचे उड्डाण करण्यासाठी कालावधी द्यायला हवा होता. नुकसानभरपाईची मागणी प्रवाशांनी केली आहे. त्याचा पाठपुरावा केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे करणार आहे.
- छाया शिंदे, प्रवासी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

