आंबेगावात मतमोजणीआधीच विजयाची तयारी

आंबेगावात मतमोजणीआधीच विजयाची तयारी
Published on

मंचर, ता. ८ : आंबेगाव तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा निकाल सोमवारी (ता. ९) दुपारी साडेबारा वाजेपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र, निकालाआधीच अनेक उमेदवारांनी ‘विजय निश्चित’ मानत विजयी मिरवणुकीची जोरदार तयारी केल्याचे चित्र दिसत आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व भाजप यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवली आहे, तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांनी आघाडी करीत परस्परपूरक उमेदवार दिले आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि काँग्रेसनेही काही ठिकाणी उमेदवार उभे केले आहेत. अनेक गटात व गणात अटीतटीची निवडणूक झाल्याने सर्वांचे लक्ष निकालाकडे लागले आहे.
विजयाची खात्री असलेल्या उमेदवारांनी विजयी रथ, ढोल-ताशा व झांज पथके, फुलांचे गुच्छ-हार तसेच फटाके यांचे आगाऊ बुकींग केले आहे. काहींनी तर यासाठी आगाऊ रक्कमही अदा केल्याची माहिती मिळाली. विशेष म्हणजे काही गट व गणांमध्ये एकमेकांविरुद्ध निवडणूक लढविणाऱ्या प्रतिस्पर्धी उमेदवारांनीही स्वतंत्र रथ बुक केल्याची माहिती एका रथमालकाने नाव न छापण्याच्या अटीवर दिली.
संभाव्य विजयी जल्लोष लक्षात घेऊन फुलविक्रेत्यांनीही तयारी सुरू केली आहे. गुलाब, झेंडू, गुलछडी आदी फुलांचा मोठा साठा करण्यासाठी त्यांनी रविवारी (ता. ८) दुपारपासूनच शेतकऱ्यांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. तसेच हार-गुच्छ तयार करण्यासाठी अतिरिक्त कारागीरांची व्यवस्था केली आहे. मतमोजणीचा निकाल येण्यापूर्वीच दिसणारी ही लगबग निवडणुकीतील वाढलेली चुरस आणि उत्साह अधोरेखित करत असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com