आंबेगाव पंचायत समितीत राष्ट्रवादीची मुसंडी

आंबेगाव पंचायत समितीत राष्ट्रवादीची मुसंडी

Published on

मंचर, ता. ९ : आंबेगाव तालुका पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जोरदार वर्चस्व प्रस्थापित करत दणदणीत विजय मिळवला आहे. एकूण दहा जागांपैकी आठ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली, तर दोन जागांवर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला यश मिळाले. या निकालाने विरोधकांच्या आघाडीचा प्रयोग मतदारांनी स्पष्टपणे फेटाळून लावल्याचे दिसून आले.
पंचायत समिती निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एकत्र येऊन परस्परपूरक उमेदवार उभे केले होते. मात्र हा ‘विळ्या-भोपळ्याचा’ प्रयोग मतदारांनी मान्य केला नाही. उलट राज्याचे माजी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील आणि माजी खासदार तथा म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या नेतृत्वावर जनतेने विश्वास कायम ठेवत विकासकामांच्या बाजूने कौल दिला. पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एकत्र निवडणूक लढवली होती. मात्र, आंबेगाव तालुक्यात जिल्हाध्यक्ष देवदत्त निकम यांनी एकत्रित लढतीला विरोध करत शिवसेना व ठाकरे गटासोबत स्वतंत्र आघाडी उभी केली. या आघाडीला केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले, तर शिवसेना व ठाकरे गटाला खातेही उघडता आले नाही. या निकालामुळे आंबेगाव तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची राजकीय पकड अधिक भक्कम झाल्याचे मानले जात आहे.

बोरघर पंचायत समिती गणात संजय गवारी व शिनोली गणातील ज्योती पारधी (दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस) यांनी शेवट पर्यंत आघाडी टिकवून ठेवून यश संपादन केले. घोडेगाव गणात कैलासबुवा काळे (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष) सुरुवातीपासूनच आघाडीवर होते. पेठ गणात पेठ ग्रामपंचायतीचे सरपंच संजय पवळे (राष्ट्रवादी काँग्रेस) विजयी झाले. कळंब गणात आंबेगाव तालुका पंचायत समिती माजी सभापती उषा रमेश कानडे (राष्ट्रवादी काँग्रेस) यांनी दुसऱ्यांदा निवडणूक लढवली. त्या सुरुवातीपासूनच अखेरपर्यंत आघाडी कायम राखली. चांडोली बुद्रुक गणात प्रियांका वाघ (शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष) या सुरुवातीपासून आघाडीवर होत्या. पारगाव तर्फे अवसरी बुद्रुक गणात श्वेता ढोबळे (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष) यांनी यश संपादन केले. जारकरवाडी गणात अंकिता वाळूंज (राष्ट्रवादी काँग्रेस) अवघ्या ५४८ मतांनी विजयी झाल्या. पिंपळगाव तर्फे महाळुंगे गणात शिवाजी निघोट (राष्ट्रवादी काँग्रेस) ही अवघ्या ४५६ मतांनी विजयी झाल्या. अवसरी बुद्रुक गणात नीलेश टेमकर (राष्ट्रवादी काँग्रेस) हे २ हजार ५७७ च्या विक्रमी मतांनी विजयी झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com