आंबेगावात शेवटच्या फेऱ्यांत फिरले निकालाचे चित्र
मंचर, ता. ११ : आंबेगाव तालुक्यातील जिल्हा परिषदेचे पाच गट व पंचायत समितीच्या दहा गणांसाठी झालेली निवडणूक चांगलीच अटीतटीची ठरली. माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना लक्ष्य करत विरोधकांनी एकत्रित आघाडी उभारून जोरदार वातावरणनिर्मिती केली होती. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवदत्त निकम यांच्या पुढाकाराने शिवसेना उद्धव ठाकरे आणि शिवसेनेसोबत व्यापक मोर्चेबांधणी केली होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जाहीर सभेचेही आयोजन विवेक वळसे पाटील यांच्या मतदारसंघात केले होते. मात्र, प्रत्यक्ष निकालात विरोधकांच्या पदरी निराशा पडली.
लोकसभा व विधानसभा निवडणुकीत विरोधकांनी आघाडी केली होती. त्यामुळे वळसे पाटील यांचे विजयाचे अंतर फारच कमी झाले होते. त्यामुळे यावेळीही तशीच पुनरावृत्ती होईल, असा अंदाज विरोधकांनी बांधला होता. या पार्श्वभूमीवर अनेक कार्यकर्ते व्यासपीठावरून व सोशल मीडियावरून दिलीप वळसे पाटील यांचे पुतणे विवेक वळसे पाटील आणि भीमाशंकर कारखान्याचे उपाध्यक्ष ॲड. प्रदीप वळसे पाटील यांच्यावर सातत्याने टीका करत होते. ‘राष्ट्रवादीचे पानिपत करू’, ‘या दोन बिबट्यांना (विवेक वळसे पाटील व ॲड. प्रदीप वळसे पाटील) पिंजऱ्यात बंद करू,’ अशा जाहीर वक्तव्यांसह सोशल मीडियावर आक्रमक प्रचार राबवला गेला. तरीही राष्ट्रवादीने गाजावाजा न करता अत्यंत शिस्तबद्ध व नियोजनबद्ध प्रचार यंत्रणा राबवली.
मतमोजणीच्या सुरुवातीच्या सात फेऱ्यांमध्ये अवसरी बुद्रुक गटात प्रशांत अभंग (शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस) आघाडीवर होते. त्यांचे प्रतिस्पर्धी विष्णू हिंगे यांचे कार्यकर्ते चिंतेत पडले होते. अभंग यांच्या काही समर्थकांनी घाईत विजयाचे अपडेट सोशल मीडियावर प्रसारितही केले. फटाके ही फोडले. अवसरी खुर्द येथील धार्मिक कार्यक्रमात अभंग यांना सत्कारासाठी जाहीररीत्या निमंत्रितही करण्यात आले. मात्र, पुढील फेऱ्यांत चित्र पालटले. विष्णू हिंगे हे विजयी झाले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून शिवसेनेत पक्षांतर केलेले अरुण गिरे, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून अवसरी खुर्द गणातून भाजपच्या चिन्हावर लढलेले दादाभाऊ थोरात यांना मतदारांनी नाकारले. उलट शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात गेलेल्या प्रीती प्रवीण थोरात यांना मतदारांनी विजयी केले. घोडेगाव गटात शिवसेनेच्या सुवर्णा देविदास दरेकर यांची लढत शेवटपर्यंत चुरशीची ठरली. प्रतिस्पर्धी मंगल हुले (राष्ट्रवादी काँग्रेस) या काही फेऱ्यांमध्ये मागे- पुढे असे वातावरण झाले होते. सुवर्णा दरेकर यांचे पती माजी जिल्हा परिषद सदस्य देविदास दरेकर साधूच्या वेशात, गळ्यात माळा व गंध लावून मतमोजणी केंद्रात उपस्थित होते. त्यांच्या चेहऱ्यावर थोडी खुशी थोडी गम, असे भाव दिसत होते. अखेरच्या फेरीत अत्यल्प मतांच्या फरकाने दरेकर विजयी झाल्या.
या निकालाने एक गोष्ट अधोरेखित केली की, मतमोजणीच्या काळात संयम राखणे आणि शेवटच्या फेरीपर्यंत शांत राहणे, हे उमेदवार व समर्थकांसाठी निर्णायक ठरते. आंबेगावच्या राजकारणात यंदा रणनीतीने गदारोळावर मात केली, अशीच चर्चा आता तालुक्यात रंगली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

