बारामती दूध संघाची निवडणूक जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बारामती दूध संघाची निवडणूक जाहीर
बारामती दूध संघाची निवडणूक जाहीर

बारामती दूध संघाची निवडणूक जाहीर

sakal_logo
By

माळेगाव, ता. २७ : बारामती तालुका सहकारी दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीचे बिगूल वाजले आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहायक निबंधक (सहकारी संस्था-दुग्ध, पुणे) सुधीर खंबायत यांनी शनिवारी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार १९ जागांसाठी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात सोमवारपासून (ता. २९) शुक्रवारपर्यंत (ता. २) उमेदवारी अर्ज दाखल करून घेतले जाणार आहेत.
सर्वसाधारण मतदार संघासाठी १४ जागा, अनुसूचित जाती-जमाती प्रतिनिधीसाठी १ जागा, महिला प्रतिनिधीसाठी २, इतर मागास वर्गीय प्रतिनिधीसाठी १ आणि भटक्या विमुक्त जाती -जमाती तसेच विशेष मागास प्रवर्ग प्रतिनिधीसाठी १ जागा निश्चित झाली आहे.
उमेदवारी अर्जाची छाननी सोमवार ५ जून रोजी बारामती निवडणूक कार्यालयात होणार आहे. वैध उमेदवारी अर्जाची यादी मंगळवारी ६ जून रोजी जाहीर होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी ६ जून ते २० जून पर्यंत मुदत आहे. उमेदवारांची अंतिम यादी २१ जून रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्याचदिवशी संबंधित उमेदवारांना निवडणूक चिन्ह दिली जाणार आहेत. २ जुलै रोजी मतदान प्रक्रिया आहे. मतमोजणी त्याच दिवशी आहे. यंदाच्या निवडणुकीसाठी अधिकृतरीत्या १९३ मतदार संस्था प्रतिनिधी मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
बारामती दूध संघाची मागील पंचवार्षिक निवडणूक सन २०१६ ते सन २०२१ या कालावधीसाठी झाली होती. परंतु, कोविडमुळे दोन वर्षे निवडणूक लांबली होती. सुरवातीच्या पहिल्या वर्षी (सन २०१६ ते सन २०१७) सतीश तावरे यांना अध्यपदावर, तर उपाध्यक्षपदावर वैभव मोरे यांना काम करण्याची संधी मिळाली होती. त्यानंतर सलग सहा वर्षे संदीप जगताप यांना अध्यक्षपदावर, तर उपाध्यक्षपदावर राजेंद्र रायकर यांनी संचालक मंडळाच्या मदतीने काम केले.
बारामती दूध संघाची निवडणूक विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या आधिपत्याखाली अनेक वर्षांपासून बिनविरोध पार पडली आहे. यंदाही तालुकास्तरावर काम करणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेतेमंडळींसह इच्छुक उमेदवारांनी आतापासूनच पक्षाकडे फिल्डींग लावण्यास सुरवात केली आहे.

बारामती दूध संघाच्या मावळत्या पदाधिकाऱ्यांनी अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली ८० कोटी रुपये किमतीचा दूध पावडर प्रकल्प नव्याने उभारण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला. या प्रकल्प प्रस्तावाला सध्या महाराष्ट्र शासनाची परवानगी मिळाली असून, केंद्र सरकारच्या मान्यतेसाठी हा प्रस्ताव पुढे गेला आहे. याशिवाय कोविड काळात अधिकचे दूध संकलन, दूध विक्री आणि शेतकऱ्यांना अधिकचे दोन पैसे देण्यासाठी या संचालक मंडळाने केलेली कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. याशिवाय दैनंदिन कामकाज, दूध संस्था व शेतकऱ्यांची प्रगती साधत संघाच्या उत्पन्न वाढीच्या दृष्टीने खंडोबानगर येथील नव्याने उभारलेल्या पेट्रोलपंपही महत्त्वपूर्ण ठरतो.
- संदीप जगताप, मावळते अध्यक्ष,बारामती दूध संघ