बारामती येथील ‘कृषी महाविद्यालया’स ‘अ’ श्रेणी

बारामती येथील ‘कृषी महाविद्यालया’स ‘अ’ श्रेणी

माळेगाव, ता. १ : अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित डॉ. शरदचंद्र पवार कृषी महाविद्यालय शारदानगर- बारामती येथील मुक्त कृषी शिक्षण केंद्रास यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाकडून ‘अ श्रेणी देऊन गौरविले. तसेच कृषी महाविद्यालयास भारतीय कृषी अनुसंधान परिषदेकडून (आयसीएआर) ‘अ’ श्रेणी प्राप्त झाली आहे.
येथील मुक्त कृषी शिक्षण केंद्रांतर्गत कृषी अधिष्ठान, कृषी व्यवसाय व्यवस्थापन पदविका, उद्यानविद्या पदविका, फळबाग उत्पादन पदविका, भाजीपाला उत्पादन पदविका, फुलशेती उत्पादन पदविका, कृषी पत्रकारिता पदविका इत्यादी अभ्यासक्रम चालविले जातात. डॉ. शरदचंद्र पवार कृषी महाविद्यालयातून गेल्या दहा वर्षांमध्ये ५००हून जास्त विद्यार्थ्यांनी मुक्त विद्यापीठामार्फत विविध पदवी व पदविका घेतल्या. तसेच त्यांनी स्वतःचे व्यवसाय, उद्योगधंदे सुरू केले. या उल्लेखनीय यशामुळे मुक्त कृषी शिक्षण केंद्राचा नावलौकिक वाढला आहे.
मार्च २०२३ मध्ये या कृषी महाविद्यालयाचे मूल्यांकन यशवंतराव चव्हाण मुक्त कृषी विद्यापीठाच्या कृषी विद्या शाखा विभागाकडून झाले होते. त्यामध्ये संचालिका डॉ. माधुरी सोनावणे, प्रा. राजेंद्र वाघ, डॉ. प्रकाश अतकरे, डॉ. अधिकराव जाधव यांचा मूल्यांकन समितीमध्ये समावेश होता. या समितीने मूल्यांकन करताना महाविद्यालयातील प्रशासकीय सोयी सुविधा, प्राध्यापक वर्ग व त्यांचे योगदान, तांत्रिक मनुष्यबळ, ग्रंथालयाच्या सुविधा, प्रयोगशाळा, आदी उपक्रमांची मुल्यमापनामध्ये दखल घेतली. बारामतीचे महाविद्यालय राबवीत असलेले आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम हे देशभर दिशादर्शक ठरत असल्याने येथील प्रशासनाचे मूल्यांकन समितीने कौतुक केले. महाविद्यालयात चालू असणारे नीती आयोगाचे इनक्युबेशन आणि इन्होव्हेशन सेंटर, स्टार्टअप, विद्यार्थ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी मिळविलेले पेटंट, आदी उपक्रमांना समितीने पसंती दिली. त्यामुळे बारामती कृषी शिक्षण केंद्रास ‘अ’ दर्जा दिल्याचे सांगण्यात आले.
यासाठी अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. नीलेश नलावडे, केंद्र संयोजक प्रा. आरती भोईटे, प्रा. प्रवीण सरवळे, प्रा.मच्छिंद्र आगळे, प्रा. संतोष गोडसे आदींनी परिश्रम घेतले.
कृषी शिक्षण केंद्रास ‘अ’ दर्जा श्रेणी देऊन गौरविल्याबद्दल अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार, विश्वस्त सुनंदा पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. नीलेश नलावडे यांनी संबंधितांचे अभिनंदन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com