

माळेगाव, ता. २२ : माळेगाव सहकारी साखर कारखाना प्रशासनाने सभासदांप्रमाणे साखर कामगारांचीही दिवाळी गोड केली. संचालक मंडळाच्या मंगळवारी (ता. २२) झालेल्या बैठकीत कामगारांना २५ टक्के बोनस दोन टप्प्यात देण्याचा निर्णय झाला. कारखान्याचे अध्यक्ष अॅड. केशवराव जगताप, उपाध्यक्ष तानाजी देवकाते यांच्या आधिपत्याखालील बैठकीत वरील धोरणात्मक निर्णय झाला. बोनसची रक्कम अदा करण्यासाठी प्रशासनाला सुमारे सव्वा सहा कोटी रुपयांची तरतूद करावी लागणार आहे, अशी माहिती कार्यकारी संचालक अशोकराव पाटील यांनी स्पष्ट केली.
माळेगाव कारखान्याचे कामगार संचालक विलास निवृत्ती कोकरे यांनी मंगळवारी संचालक मंडळासमोर कामगारांना ३६ टक्के बोनस मिळावा, अशी मागणी केली. ‘माळेगाव’ने सभासदांना राज्यात प्रथम क्रमांकाचा ३६३६ रुपये प्रतिटन अंतिम ऊस दर दिला, तसाच कामगारांनाही उच्चांकी बोनस मिळावा, असा सूर कोकरे यांनी बैठकीत लावला. या विषयासंदर्भात संचालक मंडळात साधकबाधक चर्चेअंती २५ टक्के बोनस दोन टप्प्यांत देण्याचे ठरले. त्यामध्ये कायम, हंगामी व एकत्रित वेतन घेणाऱ्या कामगारांना २५ टक्के बोनस देण्याचे ठरले. तसेच, रोजंदारीवरील कामगारांना साडेआठ हजार रुपये देण्याच्या धोरणाला सर्वानुमते मान्यता मिळाली. साखर कामगारांच्या दोन्ही संघटनांनी अधिकाधिक बोनस मिळण्यासाठी आपापली मागणी संचालक मंडळाकडे नोंदवली होती.
दरम्यान, ‘माळेगाव’च्या संचालक मंडळाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सन २०२३-२४ या ऊस गळीत हंगामाचा अंतिम ऊस दर ३६३६ रुपये प्रतिटन इतका याआगोदर जाहीर केला आहे. त्यामुळे सभासदांना एफआरपीपेक्षा तब्बल ८०५ रुपये प्रतिटन अधिक मिळणार आहेत, तर गेटकेनधारक शेतकऱ्यांना प्रतिटन ३२०० रुपयांप्रमाणे अंतिम ऊस बिल आदा होणार आहे. आता उर्वरित प्रतिटन ४३६ रुपये इतकी समाधानकारक रक्कम दिवाळीला सभासदांना मिळणार आहे, तर गेटकेनधारकांना याआगोदर दिलेले ३००० रुपये वगळता उर्वरित २०० रुपये प्रतिटन मिळणार आहेत. सध्याला एफआरपीपेक्षा जादा रक्कम देण्यात ‘माळेगाव’ राज्यात प्रथम क्रमांकावर आहे.
बॉयलर अग्निप्रदीपन गुरुवारी
माळेगाव साखर कारखान्याचा सन २०२४- २०२५ चा ऊस गळीत हंगाम विचारत घेता प्रशासनाने गुरुवारी (ता. २४) सकाळी ९ वाजता बॉयलर अग्निप्रदीपन समारंभाचे आयोजन केले आहे. कारखान्याचे अध्यक्ष अॅड. केशवराव जगताप व शांताबाई जगताप या दांपत्याच्या हस्ते समारंभ पार पडणार आहे, अशी माहिती उपाध्यक्ष तानाजी देवकाते यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.