

माळेगाव, ता. २३ : महाविकास आघाडीच्या विजयाच्या दाव्याचा फुगा फोडत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभा निवडणुकीत बारामती आपलीच असल्याचे महाराष्ट्राला दाखवून दिले. बारामतीतील जनतेने अजित पवार यांच्यावर विश्वास दाखवत मोठ्या मताधिक्याने निवडून दिले.
लोकसभा निवडणुकीत पराभवाचे शल्य पुसून गेल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांनी बारामती शहर व ग्रामीण भागात मोठा जल्लोष केला. याआगोदर अजित पवार यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार युगेंद्र पवार काठावर का होईना विजयी होतील, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने केला होता. परंतु बारामतीच्या जनताजनार्दनाने मतांच्या रूपाने विकास कामांना प्राधान्य दिले आणि अजित पवार यांच्यावरच पुन्हा एकदा विश्वास व्यक्त केला.
महाराष्ट्रात मतमोजणीच्या दिवशी महायुतीने विधानसभा निवडणुकीत मुसंडी मारल्याचा आनंद एका बाजूला बारामतीकर घेत होते, तर दुसऱ्याबाजूला हेच बारामतीकर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घड्याळ चिन्हाला किती मताधिक्य मिळेल, यावरच चर्चा करत होते. दुपारी एक वाजता पन्नास हजारांपेक्षा अधिक मतांनी अजित पवार यांनी आघाडी घेतली आणि शहर व ग्रामीण भागात एकच जल्लोष सुरू झाला. फटाक्यांची आतषबाजी झाली. यावेळी एकच वादा अजित दादा, महाराष्ट्राचा एकच दादा अजित दादा अजितदादा, अशा अनेक घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. बारामतीत विशेषतः जिरायती भागात पाण्याचा प्रश्न प्रलंबित राहिल्याने येथे अजित पवार यांना मताधिक्य घटेल, असे सांगितले जात होते. परंतु पवार यांनी जिरायती भागात पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी नीरा व कऱ्हा नदी जोड प्रकल्पासाठी १ हजार कोटी रुपयांची तरतूद केल्याचे सांगितले होते. त्यावर मात्र बारामतीच्या जिरायती भागातील लोकांनी विश्वास ठेवला.
लोकसभेच्या निवडणुकीत खासदार सुप्रिया सुळे यांना पराभूत करण्यासाठी अजित पवार यांनी आपली पत्नी सुनेत्रा यांना निवडणुकीत उतरविले होते. नणंद व भावजय यांच्या लढाईत बारामतीकरांनी सुप्रिया सुळे यांना पाठिंबा दिला होता. परंतु विधान सभा निवडणुकीत मात्र हे चित्र बारामतीकरांनी नेमके पलटवले. भावनिक मुद्यांचा विचार न करता विकास कामांना अधिक महत्त्व देताना अनेक गावे पुढे आल्याचे दिसून आले. ज्या गावांमध्ये लोकसभा निवडणुकीत तुतारी चिन्हाला लिड होते, तीच गावे विधानसभा निवडणुकीत घड्याळ चिन्हाबरोबर आल्याचे स्पष्ट झाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.