‘माळेगाव’साठी इच्छुकांची मांदियाळी

‘माळेगाव’साठी इच्छुकांची मांदियाळी
Published on

माळेगाव, ता.२३ : माळेगाव कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तिसऱ्या दिवशी १४० इच्छुकांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. गेली तीन दिवसात एकूण २२१ उमेदवारी अर्ज बारामती निवडणूक कार्यालयात प्राप्त झाले आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यशवंत माने यांनी दिली.
माळेगावच्या निवडणुकीच्या रिंगण्यात उतरण्यासाठी विरोधी गटाचे प्रमुख चंद्रराव तावरे व रंजन तावरे आदींनी आज आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. चंद्रराव तावरे यांनी सांगवी गटातून, तर रंजन तावरे यांनी माळेगाव गटातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या राजकीय प्राप्त स्थितीचा विचार करता चंद्रराव तावरे (वय ८५) हे ४५ वर्षांपासून (सन १९८०) माळेगाव कारखान्याच्या राजकारणाशी संलग्न आहेत, तर रंजन तावरे हे जवळपास तीस वर्षांपासून कारखान्याच्या राजकारणात सक्रिय असल्याचे स्पष्ट झाले. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक महत्त्वाचे चेहरे अर्ज भरण्यासाठी पुढे येणार असल्याचे सांगण्यात आले. उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची मुदत मंगळवारी (ता. २७ मे) रोजी संपत आहे.

सहा गटातून तीन दिवसात २२१ उमेदवारी अर्ज दाखल झाले. त्यामध्ये माळेगाव गटातून आजवर २३, पणदरे गटातून २०, सांगवी गटातून १४, खांडज-शिरवली गटातून २३, नीरावागज येथून २५, बारामती गटातून ३३, महिला राखीव मतदार संघातून २२, अनुसूचित जाती-जमाती मधून ४, भटक्या जातीमधून २७, इतर मागास प्रवर्गातून १२ आणि ब वर्ग संस्था मतदार संघातून ३ उमेदवारी अर्ज आजवर दाखल झाल्याची नोंद आहे.

माळेगाव गटातून शिवराज जाधवराव, अविनाश गोफणे, अॅड. राहुल तावरे, रमेश गोफणे, वसंतराव तावरे, पोपटराव बुरुंगले, चंद्रकांत काळे आदींनी उमेदवारी अर्ज दाखल केले. पणदरे गटातून अॅड.रोहन कोकरे, अरविंद जगताप, के.बी.कोकरे यांच्या अर्जाचा समावेश आहे. सांगवी गटातून चंद्रराव तावरे, किरण तावरे आदींनी उमेदवारी दाखल केली. खांडज -शिरवली गटातून नितीन आटोळे, प्रताप आटोळे, अनिल राऊत आदींचा समावेश होता. बारामती गटातून कारखान्याचे उपाध्यक्ष राजेंद्र ढवाण, महेश गावडे, नितीन शेंडे, बाळासाहेब गवारे, प्रतीक ढवाण, विपुल ढवाण, विजयसिंह गवारे, सागर जाधव आदींचे अर्ज दाखल झाले. नीरावागज गटातून विठ्ठल देवकाते, जयपाल देवकाते, भाऊसाहेब देवकाते, राजेश देवकाते आदींनी उमेदवारी जाहीर केली.

विरोधी गटाचा पक्षविरहीत पॅनेल
माळेगाव कारखान्याची निवडणूक विरोधी गटाने पक्षविरहित लढविण्याची घोषणा चंद्रराव तावरे व रंजन तावरे यांनी केली. त्यामुळे शेतकऱ्यांनी एकत्र येऊन तयार केलेले हे शेतकरी सहकार बचाव पॅनेल असल्याचे त्यांनी सांगितले. माळेगाव कारखाना हा शेतकरी सभासदांच्या मालकीचा आहे. त्यामुळे या कारखान्याचा कारभारी निवडण्याचा अधिकार सभासदांचा आहे, असे उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर रंजन तावरे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com