संवेदनशील आणि लोकाभिमुख नेतृत्व म्हणजे दादा

संवेदनशील आणि लोकाभिमुख नेतृत्व म्हणजे दादा

Published on

राज्याच्या राजकारणात गेल्या अनेक वर्षांपासून कामाचा माणूस म्हणून ओळखले जाणारे नेतृत्व म्हणजे महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार. दादा हे एक अत्यंत संवेदनशील, काटेकोर, स्पष्टवक्ते आणि परिणामकारक काम करणारे नेते आहेत. जनतेचे प्रश्न समजून घेऊन त्यावर तत्काळ निर्णय घेणारे आणि कार्यवाही करणारा नेता म्हणून त्यांचे जनमानसात विशेष स्थान आहे.
- बिपिन जगताप, स्वीय सहाय्यक, अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री

कामाची आवड किती असावी आणि काम मनापासून कसं करावं, हे शिकायचं असेल तर दादांकडून शिकावं. त्याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे बारामती. आज बारामती हे संपूर्ण देशात विकासाचे मॉडेल म्हणून ओळखले जाते. या विकासामागे दादांची दूरदृष्टी, नियोजन आणि गुणवत्तेला महत्त्व देण्याची पद्धत आहे. इमारत बांधकाम असो वा रस्ते, दादांचं बारीक लक्ष प्रत्येक ठिकाणी तपशीलवार असतं. दर्जाबाबत कोणतीही तडजोड त्यांना मान्य नसते.
दादांना रोज भेटणाऱ्यांची संख्या हजारोंमध्ये असते. एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोकांनी एखाद्या नेत्याकडे विश्वासाने येणे ही त्यांच्या कामाचा आणि माणुसकीच्या वागणुकीचा मोठा पुरावा आहे. ते लोकांमध्ये सहज मिसळतात. कोणतेही खोटे आश्वासन न देता, जे शक्य आहे ते स्पष्टपणे सांगून कार्यवाही करतात.
मुंबईला कशाला हेलपाटे मारता? हे दादांचे वाक्य म्हणजे लोकांचा वेळ आणि पैसा वाचवण्यासाठी असलेली त्यांची कळकळ आहे. त्यामुळेच आज राज्यातील कोणत्याही भागातून आलेल्या नागरिकांमध्ये असा विश्वास आहे की, दादांकडे गेलं की काम होणारच.
दादा हे शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारांचे खरे वारसदार आहेत. राजकीय समीकरणे अनेकदा बदलली, पण त्यांनी पुरोगामी विचार सोडला नाही. माणूस हा माणूस असतो. जात, धर्म, पक्ष यांच्या पलीकडे जाऊन त्यांनी नेहमी मानवतेलाच अग्रक्रम दिला.

अजितदादा हे जनतेशी जोडलेले
प्रेमाने संवाद साधण्याबरोबरच, जनहितासाठी गरज असेल तर कठोर निर्णय घेण्याची तयारी ते नेहमी दाखवतात. त्यांचा प्रत्येक निर्णय लोकहिताचा आणि वास्तवाशी जोडलेला असतो. गेल्या आठवड्यात मंत्रालयात इंदापूर येथील प्रस्तावित एमआयडीसीसंदर्भात झालेल्या बैठकीतही दादांचा संवेदनशील दृष्टिकोन पुन्हा एकदा दिसून आला. इंदापूर तालुक्यातील शेती महामंडळाची जमीन या एमआयडीसीसाठी आवश्यक आहे. पण त्या जमिनीवर एका शेतकऱ्याने ऊस लावलेला आहे, अशी माहिती मिळाल्यावर दादांनी त्या शेतकऱ्याचे नुकसान होणार नाही, त्याचा ऊस कारखान्याला जाऊ द्या, मग नियमानुसार ती जमीन ताब्यात घ्या, अशी स्पष्ट आणि मानवतावादी सूचना दिली.

दादांचा दिवस भल्या पहाटे सुरू होतो
मंत्रालयातील सहाव्या मजल्यावर असणाऱ्या त्यांच्या कार्यालयाबाहेर दररोज राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेली गर्दी दिसते. कारण जात, धर्म, पक्ष न पाहता दादा प्रत्येक माणसाचं काम प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करतात. दादांचा दिवस भल्या पहाटे सुरू होतो. ते वेळ वाया घालवत नाहीत. त्यांचं एकच तत्त्व आहे, जनतेने आपल्याला निवडून दिलं आहे, त्यांच्या सेवेसाठी झटणे हेच आपलं कर्तव्य आहे. दादांचे विकासकामांवर सतत लक्ष असते. लोकांना अडथळा होणार नाही म्हणून दिवसा किंवा रात्री उशिरा कामे पाहणीस जाऊ नका, सकाळीच जा, असा विचार त्यांच्या मनात असतो. लोकांविषयी ही असलेली संवेदनशीलता म्हणजे दादांचे खरे बलस्थान आहे.

दादांच्या दूरदृष्टीमुळेच विकास शक्य
बारामती, पुणे, पिंपरी-चिंचवडचा झालेला विकास दादांच्या दूरदृष्टीमुळेच शक्य झाला आहे. प्रशासकीय कार्यालये, उद्याने, रस्ते, शिल्पसौंदर्य, वृक्षलागवड ही सगळी कामं दादांनी केवळ गुणवत्तेवर लक्ष केंद्रित करून पूर्ण केली आहेत. दर आठवड्याला बारामतीत सुरू असलेल्या कामांची पाहणी, अंमलबजावणीची चौकशी हे त्यांच्या कामातील शिस्तीचे द्योतक आहे.

दादा हे निसर्गप्रेमीही आहेत
झाडं मोठी व्हायला वेळ लागतो, त्यामुळे झाड तोडायच्या आधी दहा वेळा विचार करा, अशी स्पष्ट तंबी ते अधिकाऱ्यांना देतात. विकास आणि पर्यावरण यांचा समतोल राखणं, ही दादांची विशेषतः आहे. शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेणं आणि त्यांना तत्काळ मदत करणं हा त्यांचा कार्यपद्धतीचा भाग आहे. यावर्षी मे महिन्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीनंतर दादांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांची विचारपूस केली आणि त्वरित मदत उपलब्ध करून दिली. अजितदादांमध्ये स्वच्छता, नीटनेटकेपणा, वक्तशीरपणा, स्पष्टवक्तेपणा या गुणांबरोबरच लोकांप्रती असलेली निःस्वार्थ संवेदनशीलता हा सगळ्यात मोठा गुण आहे.

राजकीय नेता म्हणजे लोकांच्या आशा-अपेक्षांचं केंद्रस्थान. मात्र, त्या अपेक्षा पूर्ण करणं तेही सतत ४० वर्षं लोकांसोबत राहून करणं ही अजितदादांचीच खासियत आहे. म्हणूनच मंत्रालय असो वा बारामती, दादांना भेटण्यासाठी हजारो लोकांची गर्दी नेहमी दिसते. या लोकनेत्याला, महाराष्ट्राच्या लाडक्या अजितदादांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा

Marathi News Esakal
www.esakal.com