

माळेगाव, ता. २८ : माळेगाव (ता. बारामती) नगरपंचायत पंचवार्षिक निवडणुकीत प्रचाराचा जोर दिवसेंदिवस वाढत आहे, परिणामी संपूर्ण तालुक्याचे लक्ष याकडे वेधले गेले आहे. गावातील गल्लीबोळांपासून ते चौक-चौकात उमेदवारांची वाहन रॅली व सायंकाळी होणाऱ्या कोपरा सभांमुळे निवडणूकीचे वातावरण चांगलेच तापले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष व अपक्ष उमेदवारांकडून मतदारांसाठी आश्वासनांची आतषबाजी सुरू झाली आहे. वैयक्तिक लाभाच्या योजनांसह पाण्याचा प्रश्न, रस्त्यांची दुरवस्था, गटार व्यवस्था, तरुणांसाठी रोजगाराच्या संधी व शैक्षणिक सुविधा यावर भर देत प्रत्येक पॅनेलकडून ‘आम्हीच विकास करू’ असा नारा बुलंद केला जातोय.
नगराध्यक्ष पदाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार सुयोग सातपुते यांनी मात्र प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसून येते, दुसरीकडे मात्र सतरा प्रभाग निहाय राजकीय समीकरणे चुरसीची झाली आहेत. कुठल्याही प्रभागांमध्ये कोणीही मागे नाही. उपमुख्यमंत्री अजित दादांचे कार्य, कुटुंबीय नातलग, मित्रमंडळी यांच्या ताकदीवर उमेदवारांनी आपले गणित मजबूत केले आहे. तशीच काहीशी परिस्थिती इतर अपक्ष उमेदवारांसह विविध पक्षाच्या उमेदवारांची दिसून येते. या प्रचार प्रक्रियेमध्ये तरुण मतदारांचा कल आपल्याकडे झुकविण्यासाठी संबंधित उमेदवार व नेतेमंडळींनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आहे. विशेषतः माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या सहा महिन्यांपूर्वी झालेल्या निवडणुकीत अजित पवार, बाळासाहेब तावरे विरुद्ध रंजन तावरे हे ज्येष्ठ नेते एकमेकांविरुद्ध लढले होते, मात्र माळेगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीत हे नेते एका व्यासपीठावर आले आहेत. या नेत्यांच्या भूमिकेचा उपयोग किती होतो, हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे.
प्रचाराला तंत्रज्ञानाची जोड
सोशल मीडियावर प्रचाराचा तुफान जोर असून, आकर्षक व्हिडिओ, पोस्टरबाजीमुळे डिजिटल क्षणक्षेत्रही तितकेच गजबजले आहे. व्हॉट्सअॅप ग्रुपवर घराघरांतील मतदारांशी ‘सरळ संपर्क’ साधण्याचा प्रयत्न सुरू आहे.
घराघरांत पोहोचण्यावर भर
प्रत्येक उमेदवार सकाळ-संध्याकाळ मोहिमा राबवत मतदारांच्या अडचणी ऐकत आहे. ज्येष्ठ नागरिकांशी संवाद, महिला बचतगटांची भेटी अशा विविध उपक्रमांनी मतदारांना पटविण्याचे प्रयत्न शिगेला पोचले आहेत. जेवणावळीही वाढल्या आहेत.
पक्षनेत्यांचे दौरे वाढले
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमधील तालुक्यातील विविध संस्थांचे आजी-माजी पदाधिकाऱ्यांना माळेगाव नगरपंचायत मधील प्रभाग निहाय दौऱ्यावर पाठवले आहे. हे नेते माळेगावात घराघरांत धडक देत आहेत. स्थानिक नेत्यांसाठी प्रतिष्ठेचा प्रश्न बनलेल्या या निवडणुकीत गटबाजीने चुरस अधिकाधिक तीव्र होताना दिसत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.