विकास आराखड्यावरून 
माळेगावात संघर्ष तीव्र

विकास आराखड्यावरून माळेगावात संघर्ष तीव्र

Published on

माळेगाव, ता. ११ ः माळेगाव बुद्रुक (ता. बारामती) गायरान जमीन उपलब्ध असतानाही खासगी भूखंडांवर नगरपंचायत प्रशासनाने विकास आराखड्यातून (डीपी) आरक्षणाचा मारा केल्याचा आरोप करत माळेगावात वातावरण संघर्षमय झाले आहे. बाधित गावकरी व शेतकऱ्यांनी गुरुवारपासून (ता. १२) बेमुदत बंदची हाक दिली असून, विद्यमान विकास आराखडाच रद्द करण्याची ठाम मागणी पुढे केली आहे. त्यामध्ये तावरे, वाबळे, वाघमोडे, गोफणे आदी आडनावांचे बाधित शेतकरी आंदोलनासाठी पुढे आले आहेत.
येथील आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे की, सुमारे २५० एकर गायरान जमीन उपलब्ध असताना खासगी जमिनींवर विविध सार्वजनिक सुविधांसाठी आरक्षणे टाकण्यात आली आहेत. यामुळे अनेक शेतकरी व भूधारक अडचणीत सापडले असून, त्यांच्या मालमत्ता हक्कांवर गदा येत आहे. आम्हाला विश्वासात घेऊन सर्वसमावेशक आणि न्याय असा नवीन विकास आराखडा तयार करावा, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली आहे.
दरम्यान, बारामतीचे प्रांताधिकारी वैभव नावडकर यांनी हा प्रश्न चर्चेतून सोडविता येऊ शकतो, असे सांगत आंदोलन करण्याची आवश्यकता नसल्याचे आवाहन केले आहे. प्रशासन नागरिकांच्या हरकती व सूचनांचा गांभीर्याने विचार करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र, प्रशासनाकडून ठोस आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नसल्याचे संतोष वाघमोडे यांच्यासह आंदोलनकर्त्यांनी सूचित केले आहे. त्यामुळे माळेगावातील परिस्थितीकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com