ताम्हिणी घाटात सहा तरुणांचा मृत्यू

ताम्हिणी घाटात सहा तरुणांचा मृत्यू

Published on

माले, ता. २० : पुण्यातून कोकणात फिरण्‍यासाठी निघालेल्‍या तरुणांच्या थार मोटार ताम्हिणी घाटात रायगड हद्दीतील धोकादायक वळणावर सुमारे पाचशे फुट खोल दरीत कोसळली. या अपघातात मोटारीतील सहाही तरुणांचा मृत्यू झाला. सोमवारी (ता. १७) मध्‍यरात्रीच्या सुमारास हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज असून, तीन दिवसांनंतर गुरुवारी (ता. २०) या अपघाताची माहिती मिळाली.
पुण्‍याकडून कोकणाकडे जाताना रायगड जिल्‍‍ह्यातील कोंडेथर गावानंतर घाट उतरतानाच्‍या पहिल्‍याच तीव्र वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून वाहन दरीत कोसळल्‍याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. या अपघातात प्रथम शहाजी चव्‍हाण (वय २२, रा. कोंढवे धावडे, पुणे), पुनीत सुधाकर शेट्टी (वय २०), साहील सहादू गोठे (वय २४), महादेव कोळी (वय १८), ओंकार सुनील कोळी (वय १८), शिवा अरुण माने (वय १९, सर्व रा. कोपरे गाव, पुणे) यांचा मृत्यू झाला. हा भीषण अपघात रात्रीच्‍यावेळी झाल्‍याने हा प्रकार कुणाच्‍याही लक्षात आला नाही. सर्व मृतदेह हाती आले आहेत.
वरील सर्व सहा मित्र सोमवारी रात्री साडेअकरा वाजता थार मोटारीने (क्र. एम.एच. १२ वाय.एन. ८००४) कोकणातील दिवेआगर (जि. रायगड) येथे फिरण्‍यासाठी पुण्‍यातील उत्‍तमनगर येथून निघाले. मंगळवारी (ता. १८) सकाळपासून रात्रीपर्यंत त्‍यांचे फोन लागत होते, परंतु उत्तर मिळत नव्‍हते. त्‍यानंतर फोन बंद झाले. त्‍यामुळे बुधवारी नातेवाईक व मित्रांनी पुणे ते ताम्हिणी घाट, आणि दिवेआगर परिसरात शोध घेतला.
परंतु, या तरुणांचा अथवा त्यांच्या थार मोटारीचा शोध लागला नाही. त्‍यामुळे बुधवारी उत्तमनगर पोलिसांत ते हरवल्‍याची फिर्याद देण्‍यात आली. त्‍यानंतर गुरुवारी सकाळी सात वाजल्यापासून रेस्‍क्‍यु टीम‍सच्‍या मदतीने, तसेच ड्रोनच्या साह्याने ताम्हिणी घाटात शोध सुरु करण्‍यात आला. सकाळी नऊ वाजता ताम्हिणी घाटातील अवघड वळणावर अपघात प्रवण ठिकाणी खोल दरीत सणसवाडी (जि. रायगड) गावच्‍या हद्दीत थार मोटार व मृतदेह आढळून आले. त्‍यानंतर शोधकार्याने वेग घेतला.

मृतदेह दरीतून काढणे आव्‍हानात्‍मक
मोटार व मृतदेह अत्‍यंत खोल दरीत असल्‍यामुळे बचाव कार्य अत्‍यंत आव्‍हानात्‍मक झाले होते. रायगडच्या पोलिस अधीक्षक आंचल दलाल, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अभिजित शिवथरे, उपविभागीय पोलिस अधिकारी पुष्‍कराज सूर्यवंशी यांच्‍या मार्गदर्शनाखाली माणगावचे पोलिस निरीक्षक निवृत्ती बोराडे, सहायक पोलिस निरीक्षक भैरु जाधव, रायगड आपत्‍ती व्‍यवस्‍थापन, मुळशी तालुका आपत्ती‍ व्‍यवस्‍थापन समिती संस्‍था, शेलार मामा रेस्क्यू टीम, रेस्क्यू चॅरीटेबल ट्रस्‍ट पुणे, एसव्हीआरएसएस रेस्क्यू टीम, स्‍थानिक ग्रामस्‍थांच्‍यावतीने मदत कार्य करण्‍यात आले. तीन मृतदेह वर काढण्‍यात आले असून, उर्वरित तीन मृतदेह दरीतून वर आणण्‍यासाठी रात्री उशिरापर्यंत प्रयत्‍न सुरु होते.

वेगमर्यादेसाठी उपाययोजनांची गरज
मुळशी तालुका व पुणे जिल्‍‍ह्याची हद्द संपल्‍यानंतर रायगड जिल्‍ह्यातील कोंडेथर गावापासून पुढे ताम्हिणी घाट सुरु होतो. अत्‍यंत तीव्र वळणांचा हा घाट आहे. आजूबाजूला उभी व खोल दरी, घनदाट जंगल असा हा परिसर आहे. वेगात असलेली वाहने वळणावर अनियंत्रित झाल्‍यास दरीच्‍या बाजूला ओढली जातात. संपूर्ण परिसर अपघात प्रवणक्षेत्र आहे. येथे लोखंडी रेलिंग आहेत, परंतु येथे घाटात जाड भिंतींची उपाययोजना, तसेच वेगमर्यादा राखण्‍यासाठी गती नियंत्रक करणे गरजेचे आहे, असे रेस्क्यू टीमचे प्रमोद बलकवडे व शेलार मामा, सामाजिक कार्यकर्ते अंकुश ढमाले, ताम्हिणीचे माजी सरपंच संदीप बामगुडे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com