भूमिगत विद्युत वाहिनीचे काम पाडले बंद

भूमिगत विद्युत वाहिनीचे काम पाडले बंद

मांजरी खुर्द, ता. १० : कोलवडी-मांजरी खुर्द व वाघोली (ता. हवेली) रस्त्याने एका खासगी बांधकाम व्यवसायिकासाठी सुरू असलेले भूमिगत विद्युत वाहिनीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने रोखले आहे. दोन्ही गावांचे ग्रामपंचायत प्रशासन, स्थानिक कार्यकर्ते व शेतकऱ्यांनी याबाबत आवाज उठवल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने ही कारवाई केली आहे.

थेऊर (ता. हवेली) येथील महावितरण केंद्रातून मांजरी खुर्द येथे विकसित होत असलेल्या एका मोठ्या गृहप्रकल्पासाठी परिसरातून जाणाऱ्या रस्त्यालगत चर खोदून ही भूमिगत विद्युत वाहिनी टाकण्यात येत आहे. मात्र, महावितरणने सार्वजनिक मांजरी खुर्द व कोलवडी या दोन्ही ग्रामपंचायती तसेच शेतकऱ्यांना विश्वासात न घेता मनमानी पद्धतीने हे काम सुरू केले होते. कोलवडी-मांजरी खुर्द रस्ता व मांजरी खुर्द वाघोली रस्त्याने शेतकऱ्यांच्या उभ्या पिकातून ठिकठिकाणी खोदकाम करून वाहिनी टाकली जात आहे. त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. याशिवाय रस्त्यांचीही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

या कामासाठी महावितरण व गृहप्रकल्पाने खुदाई करताना संबंधित शेतकरी व ग्रामपंचायत प्रशासनाला विश्वासात घेतले नाही. बेकायदेशीर व अशास्त्रीय पद्धतीने होत असलेल्या या कामांमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे व रस्त्यांचे नुकसान झाले आहे. असा आरोप कोलवडी येथील शेतकरी कार्यकर्ते रवींद्र गायकवाड, अशोक गायकवाड, जयसिंग गायकवाड, काळूराम गायकवाड, विजय गायकवाड यांनी केला आहे. येथील शेतकऱ्यांनी आमदार अशोक पवार यांची भेट घेऊन त्याबाबत तक्रार केली आहे. दरम्यान, आमदार पवार यांनी ग्रामस्थांच्या शंकेचे निरसन होईपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभाग व महावितरणला हे काम बंद करण्यास सांगितले आहे.

ग्रामपंचायत व स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात न घेता सार्वजनिक बांधकाम विभागाने हे काम करण्यास परवानगी दिली आहे. महावितरणकडून होत असलेल्या खोदाईमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे व रस्त्याचे मोठे नुकसान होत आहे. याशिवाय खुदाई करताना प्रवाशांच्या सुरक्षेची कोणतीही काळजी घेतली गेलेली नाही. त्यामुळे ग्रामपंचायत हद्दीत हे काम आम्ही बंद पाडले आहे.
- रूपेश उंदरे पाटील, सरपंच, मांजरी खुर्द (ता. हवेली)

सार्वजनिक बांधकाम विभागाने महावितरणची विद्युत वाहिनी टाकण्यासाठी परवानगी दिली आहे. मात्र, लोकप्रतिनिधी व स्थानिक शेतकरी व ग्रामपंचायत प्रशासनाने या कामावर आक्षेप घेतला. त्यामुळे विद्युत वाहिनी टाकण्याचे काम काही कालावधीसाठी थांबविण्यात आले आहे.
- जान्हवी रोडे, सहाय्यक अभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग, (ता. हवेली)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com