
लोणी भापकर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी नंदकुमार मदने
मोरगाव, ता. ४ : लोणी भापकर तालुका बारामती ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी नंदकुमार बाळासाहेब मदने यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णयअधिकारी म्हणून लोणी भापकरच्या ग्रामविकास अधिकारी उज्ज्वला शिंगाडे यांनी काम पाहिले. पंचवार्षिक निवडणुकीत थेट जनतेतून निवडून आलेल्या सरपंच गीतांजली रवींद्र भापकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या सभेमध्ये ही निवड झाली. उपसरपंच पदासाठी एकमेव नंदकुमार मदने यांचा अर्ज आल्याने ही निवड बिनविरोध झाल्याचे शिंगाडे यांनी जाहीर केले. लोणी भापकर ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत दोन गटांचे उमेदवार प्रत्येक वॉर्डामध्ये उभे होते. येथील रवींद्र भापकर यांच्या गटाला सरपंच पदासह नऊ जागा मिळाल्या तर बारामती पंचायत समितीचे माजी सदस्य राहुल भापकर यांच्या गटाला केवळ तीन जागांवर समाधान मानावे लागले. उपसरपंच पदासाठी आयोजित केलेल्या सभेला सर्व सदस्य उपस्थित होते. गावाच्या विकासासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सर्वांना विश्वासात घेऊन योग्य त्या दिशेने काम करणार असल्याची माहिती निवडीनंतर मदने यांनी दिली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य रवींद्र भापकर उज्ज्वला कडाळे, आशा भापकर, तानाजी पवार, कविता आरडे, श्रीकांत भापकर, स्वाती बनसोडे, सौरभ गोलांडे, अरुणा ठोंबरे, सोनाली पवार आदी उपस्थित होते.