सायंबाचीवाडीमध्ये ४२ बोगस मतदार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सायंबाचीवाडीमध्ये ४२ बोगस मतदार
सायंबाचीवाडीमध्ये ४२ बोगस मतदार

सायंबाचीवाडीमध्ये ४२ बोगस मतदार

sakal_logo
By

मोरगाव, ता. १० : सायंबाचीवाडी (ता. बारामती) ऑनलाइन पद्धतीने मतदारयादीत समाविष्ट असलेली जवळपास ४२ नावे बोगस असल्याची तक्रार झाली असून, या बोगस मतदारांची नावे कायमस्वरूपी कमी करण्याची मागणी तहसीलदार विजय पाटील यांच्याकडे केली आहे.
सायंबाचीवाडी येथे राष्ट्रवादी पुरस्कृत दोन वेगवेगळे गट असून, सध्या ग्रामपंचायत प्रशासकाच्या माध्यमातून कामकाज केले जाते. पुढील पंचवार्षिक निवडणुकीसाठी सध्या वॉर्डरचना, मतदार याद्या निवडणूक कार्यक्रम, अशी प्रशासनाची तयारी सुरू आहे. या ऑनलाइन पद्धतीने दाखल झालेल्या मतदार यादीतील ४२ मतदार हे दुसऱ्या मतदारसंघांमध्ये असून, त्या मतदारसंघामध्ये ते खूप वर्षापासून मतदार यादीत समाविष्ट आहेत. नियमानुसार नवीन ठिकाणी नाव देताना जुने नाव कायमस्वरूपी रद्द करून दुसऱ्या मतदारसंघांमध्ये नाव दाखल करता येते. मात्र, जुन्या यादीतील नाव रद्द न करता नवीन मतदार संघामध्ये ऑनलाइन पद्धतीने नाव दाखल करून संबंधितांनी शासनाची फसवणूकच केली असल्याचा आरोप ज्ञानेश्वर भापकर, रामदास भापकर, शरद भापकर, मनोहर भापकर, ऋषी भापकर यांनी केला आहे.
या तक्रारीनंतर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी अमित भापकर यांच्याकरवी बारामती निवडणूक शाखेकडून संबंधित प्रकाराची चौकशी करून अहवाल मागविण्यात आला होता. मात्र, बारामती निवडणूक शाखेमध्ये बोगस मतदार तक्रार प्रकरणातील नावे रहिवासी आहेत आणि रहिवासी नाहीत, असे दोन अहवाल सादर झाले आहेत. याशिवाय संबंधित केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी यातील एक रिपोर्ट खोटा असल्याची कबुली ही निवडणूक शाखेला दिली आहे.

फेरतपासणी होणार
यासंदर्भात बारामती निवडणूक विभागाच्या नायब तहसीलदार प्रतिभा शिंदे म्हणाल्या की, येथील बोगस मतदार तक्रार प्रकरणासंदर्भात पुन्हा नायब तहसीलदारस्तरावरून फेरतपासणी होणार आहे. वस्तुस्थिती पाहून या प्रकरणांमध्ये योग्य तो निर्णय घेतला जाईल.