विहिरीतील गाळ काढण्याचे 
काम टप्प्या टप्प्याने सुरू

विहिरीतील गाळ काढण्याचे काम टप्प्या टप्प्याने सुरू

मोरगाव, ता. ३ : येणाऱ्या पावसाळ्यात व खरीप हंगामात शेतकऱ्यांना भरीव फायदा व्हावा म्हणून सध्या बारामती तालुक्याच्या जिरायती भागातील शेतकऱ्यांचा विहिरीतील गाळ काढणे, आडवे छिद्र पाडून पाण्याचे झरे खुले करणे, नैसर्गिक पाणीसाठ्याच्या ठिकाणातील गाळ काढणे अशी कामे टप्प्याटप्प्याने सुरू आहेत.

पावसाच्या पाण्याचा थेंब शिवारात आडून राहील आणि मुरेल यासाठी जिरायती पट्ट्यातील शेतकरी अनुभवानुसार डोळसपणे उपाययोजना दरवर्षी उन्हाळ्यात करतात. कायमस्वरूपी सिंचनयोजना नसल्यामुळे शेतकऱ्यांना जास्तीत जास्त विहिरीच्या पाण्यावरच शेतीसिंचनाचा प्रश्न सोडवावा लागतो. सध्या ५० ते २०० फुटांच्या अंतरावर विहिरीत आडवे छिद्र पाडून नैसर्गिक झरे खुले करून पाणी मिळविण्याचा प्रयत्न शेतकरी करत आहेत. तर दुसरीकडे विहिरीतील साचलेला गाळ काढून पाणीसाठवणुक क्षमता वाढविणे व गाळाने बुजलेले नैसर्गिक झरे खुले करणे हे काम शेतकरी प्राधान्याने करीत आहेत.

पंधरा जून ते पंधरा जुलै हा खरीप हंगामातील पिकांच्या पेरणीचा हंगाम असतो. मात्र, दरवर्षी मे महिन्यात अवकाळी पावसाची हजेरी जिरायती भागात लागते. त्यामुळे अवकाळी पावसापूर्वी व खरीप हंगामाच्या पूर्वी ही कामे करण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न आहे. सध्या आर्थिक टंचाई असली तरी उधारउसनवारी आणि कर्ज काढून विहिरीतील गाळ काढणे व जलस्रोत बळकट करण्यासाठी आवश्यक काम शिवारात व शेतात करून घेण्याकडे कल असल्याची माहिती मोरगाव येथील शेतकरी विकास तावरे, पिंटू तावरे, दिगंबर तावरे, तरडोली येथील शेतकरी विशाल पवार, विनायक गाडे, राजेंद्र वाघ यांनी दिली.

तरडोली (ता. बारामती) : विहिरीतील गाळ काढून आडवे छिद्र पाडून नैसर्गिक झरे खुले करण्याचे काम करताना.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com