बारामतीत रेव्हेन्यू तिकीटांचा तुटवडा

बारामतीत रेव्हेन्यू तिकीटांचा तुटवडा

मोरगाव, ता. १६ : बारामती तालुक्यात गेल्या दोन महिन्यांपासून पोस्ट कार्यालयात रेव्हेन्यू तिकीट मिळत नसल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. पोस्ट कार्यालय, महा-ई-सेवा केंद्र, स्टॅम्प व्हेंडर यांच्याकडून तिकीट मिळवण्यासाठी नागरिकांची कसरत सुरू आहे. मात्र कोणाकडेच हे तिकीट उपलब्ध नसल्याने नागरिकांची स्टॅम्पशी संबंधित कामे खोळंबत आहेत.

बारामती तालुक्यात एकाही पोस्ट कार्यालयात एक रुपयांचे तिकीट मिळत नसल्यामुळे मार्च महिन्यामध्ये सर्वाधिक गैरसोय ही नागरिक व शेतकऱ्यांची झाली. वास्तविक बारामती तालुक्यामध्ये पतसंस्था, महिला बचत गट यांच्याशी संलग्न वेगवेगळे व्यवहार करण्यासाठी या एक रुपयांचे तिकीट आवश्यक असते. मात्र जवळपास दोन-तीन महिन्यांपासून हे तिकीट मिळत नसल्यामुळे महिला बचत गटांची, शेतकरी गटांची तसेच पतसंस्थांशी संबंधित कामे असणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे. बारामती तालुक्यात १५हून अधिक पोस्ट कार्यालय असून एकाही पोस्ट कार्यालयांमध्ये हे तिकीट उपलब्ध नसल्याची वस्तुस्थिती आहे. वास्तविक, हे तिकीट पोस्ट कार्यालयात उपलब्ध असते. मात्र तिकिटांची उपलब्धताच नसल्याने नागरिकांना धावाधाव करावी लागत आहे.

कर्जाची प्रक्रिया तसेच दप्तरी नोंदी करण्यासाठी हे तिकीट गरजेचे असून त्यामुळे पतसंस्था, शेतकरी गट चालक, महिला बचत गट चालक यांना मोठी रिस्क घेऊन तिकिटांअभावी कर्ज द्यावे लागत आहे. संबंधित विभागाने या विषयाचे गांभीर्य ओळखून पोस्ट कार्यालयामध्ये रेव्हेन्यू तिकीट उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

सर्वसामान्य नागरिकांना सरकारी कामांसाठी या तिकिटाची गरज असून संबंधित विभागाने तिकीट उपलब्ध करून द्यावे अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. यासंदर्भात बारामती तालुक्याचे पोस्टमास्तर लालासाहेब जाधव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

लायसनच्या मागणीला प्रतिसाद नाही
बारामती पोस्टविभाग हा अनेक वर्षांपासून शिवाजीनगर पुणे या विभागाच्या अखत्यारीत होता. मात्र गेल्या काही महिन्यांपासून शिवाजीनगर पुणे विभागापासून बारामती पोस्ट विभाग हा स्वतंत्र करण्यात आला आहे. त्यानंतर बारामती विभागाने विधान भवन येथे नोंदणी महानिरीक्षक यांच्याकडे या रेव्हेन्यू तिकिटांच्या विक्रीसाठी लायसनची अधिकृत मागणी केली आहे. मात्र या कार्यालयाकडून बारामती विभागास प्रतिसाद मिळत नसल्यामुळे मुळातच बारामती विभागाला हे तिकीट विक्री करण्याचे लायसन अद्याप उपलब्ध नसल्याची माहिती पोस्ट कार्यालयाच्या अधिकृत सूत्रांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com