माळवाडी लोणीत ओढा खोलीकरणास प्रारंभ
मोरगाव, ता. ५ : माळवाडी लोणी (ता.बारामती) येथे सकाळ रिलीफ फंड, देसाई ब्रदर्स लिमिटेड, केशव इंजिनिअरिंग सर्व्हिसेस वारजे माळवाडी पुणे, ओम साई गणेश प्रतिष्ठान व लोकसहभाग यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (ता.४) ओढा खोलीकरणाच्या कामास प्रारंभ करण्यात आला.
गेली अनेक वर्षांपासून येथील शेतकऱ्यांची खोलीकरण करण्याची मागणी होती. माळवाडी ग्रामपंचायत शेतकरी यांनी केलेल्या मागणीमुळे या ठिकाणी ‘सकाळ’ने ओढा खोलीकरण काम करण्यास निधी उपलब्ध करून दिला आहे. तर पुण्यातील केशव इंजिनिअरिंग सर्व्हिसेस यांनी या कामासाठी मोफत यंत्र उपलब्ध करून दिले आहे.
शेतकऱ्यांच्या हस्ते नारळ वाढवून या कामाचा प्रारंभ करण्यात आला. त्यावेळी माळवाडी लोणीचे उपसरपंच गणेश बोरावके, तानाजी लडकत, विवेक बोरावके, कावेरी लडकत, अभिषेक बोरावके, सिद्धेश जगदाळे उपस्थित होते. खोलीकरणाच्या कामामुळे टंचाईग्रस्त भागात पावसाळ्यानंतर भरीव फायदा होत असल्यामुळे खोलीकरण काम शंभर टक्के करावे, अशी शेतकऱ्यांची आग्रही मागणी आहे. केलेल्या खोलीकरणाच्या कामामुळे ओढ्यावर असलेल्या बंधाऱ्यांमध्ये पाणीसाठा होण्यास मदत होणार आहे. याशिवाय वर्षानुवर्षे ओढ्यात साचलेला गाळ पूर्णपणे निघून पाणीसाठा होण्यास मदत होणार आहे.
माळवाडी येथील ओढ्यात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्यामुळे आत्तापर्यंत पावसाचे पाणी वाहून जात होते. ते साठवून राहण्यास तशी पूरक परिस्थिती नसल्यामुळे शेतकऱ्यांचे पाण्याचा अपव्यय होऊन नुकसान होत होते. सकाळ माध्यम समूहाच्या पुढाकारातून येथे होत असलेल्या कामाबद्दल येथील ग्रामपंचायत सदस्य दत्ता लोणकर, बारामती पंचायत समितीच्या बांधकाम विभागाचे शाखा अभियंता सुहास लडकत, उपसरपंच गणेश बोरावके यांनी समाधान व्यक्त केले.
खोलीकरणाच्या कामाचा शेतकऱ्यांचा दीर्घकाळ फायदा होईल. या सामाजिक कामास लोक सहभागाची जोड देणार असल्याचे यावेळी गणेश बोरावके, सुहास लडकत यांनी सांगितले.
03082