बाबुर्डीतील लोकवस्त्या रस्त्यापासून वंचितच
मोरगाव, ता. २४ : बाबुर्डी (ता.बारामती) येथील कोकरे वस्ती, खोमणे वस्ती, लडकत वस्ती, गोरगल वस्ती येथील नागरिक आत्तापर्यंत मिळेल त्या खासगी रस्त्याने रहदारी करत असून हक्काच्या रस्त्यापासून वंचित आहेत.
वास्तविक, खासगी रस्ता कच्चा असल्यामुळे पावसाळ्यात येथे मोठ्या प्रमाणात खड्डे होऊन पाणी साचते व संपूर्ण रस्ता चिखलमय होतो, त्यामुळे या लोकवस्त्यांचा संपर्क पूर्णपणे तुटत असल्याने मोठी गैरसोय होत आहे. नुकताच ॲड. शिवाजी कोकरे, दादा कोकरे यांनी आमच्या लोकवस्त्यांसाठी कायमस्वरूपी रस्ता द्यावा, अशी मागणी बारामतीचे तहसीलदार गणेश शिंदे यांच्याकडे केली आहे. येथे संपूर्ण शेतकरी वर्ग असून रहदारीसाठी व दैनंदिन कामासाठी बाबुर्डी ,मोरगाव , तरडोली या ठिकाणी ये जा करावी लागते. शेतमालाच्या वाहतुकीसाठी, रहदारीसाठी पक्क्या रस्त्याची गरज आहे. शालेय विद्यार्थ्यांनाही रस्त्याअभावी पावसाळ्यात शाळेत जाताना अडचणी येतात. कोकरे वस्ती, खोमणे वस्ती, लडकत वस्ती, गोरगल वस्ती येथे सुमारे १२० जणांची लोकवस्ती आहे. हे नागरिक पिढ्यानपिढ्या येथे राहत असून पारंपरिक व आधुनिक पद्धतीने शेती व्यवसाय व पशुपालन आणि इतर व्यवसायांवर आपली उपजीविका करतात.
या लोकवस्त्या कऱ्हा नदीकाठी वसलेल्या असून नदीच्या पलीकडे तरडोली हे गाव आहे. नदी प्रवाहित नसेल अथवा पाणी कमी असेल तरच तरडोली गावात जाता येते. त्यासाठी कोणताही पूल अथवा पक्का रस्ता उपलब्ध नाही. पावसाळ्यात नदी प्रवाहित असेल तर शेजारील तरडोली गावाशी संपर्क पूर्णतः तुटतो. मोरगाव ते बाबुर्डी जाणारा डांबरीकरण रस्ता या लोकवस्त्यांपासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर असून पाऊस नसेल तरच त्या रस्त्यापर्यंत जाणे शक्य होते. काळ्या मातीची शेती असल्याने व कोणताही खडकाळ भूभागाचा अभाव असल्याने थोडा पाऊस पडला तरी डांबरी रस्त्यापर्यंत पोचणे अशक्य होते. गेली अनेक वर्षांपासून येथील नागरिक सहा फूट रुंदीच्या खासगी रस्त्याचा वापर करत आहे. मात्र, तो रस्ता मातीमय असून दरवर्षी पावसाळ्यात येथील नागरिकांना अनंत अडचणींना सामोरे जावे लागते. वारंवार मागणी करूनही अद्याप येथे पक्का रस्ता झाला नाही. येथील वस्तुस्थितीची पाहणी करून बाबुर्डी ग्रामपंचायतच्या कार्यक्षेत्रातील लोकवस्त्यांना पक्का रस्ता द्यावा, अशी येथील ग्रामस्थांची मागणी आहे.
प्राण्यांसह मनुष्याचेही हाल
गतवर्षी पावसाळ्यात एका आजारी गाईवर उपचार करण्यासाठी रस्त्याअभावी डॉक्टर येऊ शकले नाहीत. त्यामुळे त्या गायीचा मृत्यू झाला व शेतकऱ्याचे एक लाखांचे नुकसान झाले. तर नुकताच एक चार चाकी खासगी रस्त्यावर झालेल्या चिखलात अडकली. त्यामध्ये प्रसूतीसाठी एका गर्भवती महिलेस हॉस्पिटलला नेले जात होते; मात्र रस्त्याच्या गैरसोयीमुळे त्या महिलेस असंख्य वेदना सहन करून ताटकळत थांबावे लागले. पावसाळ्यात या लोकवस्तीमधील मुले शाळेतच जात नसल्याची वस्तुस्थिती आहे. त्यामुळे रस्त्याच्या गैरसोयीचा शिक्षणावरही परिणाम होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.