तरडोलीचे उपसरपंच जगदाळे अपात्रच
मोरगाव, ता. ११ : तरडोली (ता. बारामती) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदावर काम करताना आर्थिक हितसंबंध जोपासल्यामुळे विद्यमान उपसरपंच नवनाथ जयसिंग जगदाळे यांच्या अपात्राचे आदेश नुकताच पुणे विभागाच्या अतिरिक्त विभागीय आयुक्त कविता द्विवेदी यांनी दिला आहे.
तरडोलीची पंचवार्षिक निवडणूक जानेवारी २०२१ मध्ये होऊन २५ फेब्रुवारी २०२१ रोजी नवनाथ जगदाळे यांची सरपंचपदी बहुमताने निवड झाली. मात्र, सरपंचपदी काम करताना त्यांनी पत्नीच्या नावे असलेल्या शुभम साडी डेपो या दुकानातून २७ जुलै २०२१ रोजी कर्मचाऱ्यांना गणवेश खरेदी केले व त्याचे बिल ग्रामपंचायत निधीमधून काढले. शिवाय नियमबाह्य चहापान खर्च ग्रामपंचायत निधीमधून केला. ग्रामपंचायत कामकाजामध्ये स्वतःचे व स्वतःच्या कुटुंबाचे आर्थिक हितसंबंध जोपासत काम केल्याची तक्रार माजी सरपंच व विद्यमान सदस्या विद्या भापकर व सदस्यांनी पंचायत समितीकडे तक्रार केली होती. पंचायत समितीने वस्तुस्थितीची चौकशी करून जगदाळे हे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ चे कलम १४ ग नुसार सदस्यपदी राहण्यासाठी अपात्र होत असल्याबाबतचा अहवाल पाठविला. त्याच्या आधारे तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जगदाळे यांना सरपंच व सदस्यपदासाठी अपात्र केले होते. मात्र, त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निकालाच्या विरोधात तत्कालीन अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ. अनिल रामोड यांच्याकडे अपील दाखल केले. डॉ. रामोड यांनी जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश रद्द करत जगदाळे यांना पात्र ठरवले. त्यानंतर भापकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यांनी याप्रकरणी फेरचौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
त्यात जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी जगदाळे यांना पुन्हा अपात्र केले. मात्र, या आदेशाविरोधात जगदाळे यांनी पुन्हा अतिरिक्त विभागीय आयुक्तांकडे अपील दाखल केले. मात्र, या प्रकरणातील कागदोपत्री पुरावे कायदेशीर बाजू व युक्तिवाद तपासून जगदाळे यांचे अपील अतिरिक्त विभागीय आयुक्त कविता द्विवेदी यांनी अमान्य केले व जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र केल्याचा आदेश कायम ठेवला. त्यामुळे जगदाळे हे विद्यमान उपसरपंच व सदस्य या दोन्ही पदावरून अपात्र झाले आहेत. मात्र, यासंदर्भात न्याय मागण्यासाठी उच्च न्यायालयात जाणार असल्याचे नवनाथ जगदाळे यांनी सांगितले.
भापकर यांच्या बाजूने संपूर्ण कायदेशीर बाजू मांडत युक्तिवाद करत ॲड. हेमंत भांड पाटील यांनी काम पाहिले.
बहुचर्चित ग्रामपंचायत
पंचवार्षिक निवडणुकीत चार पॅनेलचे नऊ उमेदवार, सरपंच निवडीनंतर निवडणूक प्रक्रिया रद्द, अल्पमतात असून तहकूब सभेतून नियमानुसार सरपंच निवड, सरपंच अविश्वास ठराव, सदस्य अपात्र, दर दोन महिन्याला नवीन सरपंच, अशा वेगवेगळ्या घटनांतील सातत्यामुळे तरडोली ग्रामपंचायत बहुचर्चित आहे. त्यात पुन्हा एकच सदस्य तीन वेळा अपात्र झाल्याची भर पडली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.