मासाळवाडी येथे ओढ्याचे खोलीकरण

मासाळवाडी येथे ओढ्याचे खोलीकरण

Published on

मोरगाव, ता. २३ : मासाळवाडी (ता. बारामती) येथे पाऊण किलोमीटर अंतरावरील ओढा खोलीकरणाचे काम पूर्ण असून १२ हजार घनमीटर पेक्षा अधिक गाळाचा उपसा येथे झाला आहे. या खोलीकरणाचा फायदा तरडोली, मासाळवाडी, लोणी भापकर या तीन गावांतील शेतकऱ्यांना होणार आहे.
‘सकाळ’ रिलीफ फंड, देसाई ब्रदर्स लिमिटेड, ओम साई गणेश प्रतिष्ठान, मासाळवाडी ग्रामपंचायत, लोकसहभाग यांच्या संयुक्त विद्यमाने व मासाळवाडीचे सरपंच मुरलीधर ठोंबरे यांच्या पाठपुराव्यामुळे हे काम झाले पूर्वी ओढ्याच्या दुतर्फा असलेल्या अतिक्रमणामुळे खोलीकरणास शेतकऱ्यांची मानसिकता नव्हती. मात्र, २०१४ नंतर सुरू झालेल्या जलसंधारणाच्या चळवळीमुळे आणि पूर्वीच्या कामांचे दृश्य परिणाम दिसल्यामुळे शेतकऱ्यांचा सकारात्मक सहभाग वाढला. यापूर्वी केलेल्या कामांचा परिणाम शेतकऱ्यांना दिसत असल्यामुळे खोलीकरण १०० टक्के झाले पाहिजे, असा शेतकऱ्यांचा आग्रह आहे. येथे खोलीकरण करताना शेतकऱ्यांकडून गाळ वाहतूक करण्यासाठी सहभाग मिळाला. तर ओम साई गणेश प्रतिष्ठान यांच्याकडून मोफत मशीन उपलब्ध झाले. ‘सकाळ’ रिलीफ फंड व देसाई ब्रदर्स लिमिटेड यांच्याकडून डिझेल खर्च करण्यात आला.
या कामामुळे तीन गावच्या शेतकऱ्यांना फायदा होणार असून अर्धा किलोमीटर अंतरावरील विहिरींना पाण्याची पातळी वाढण्यास मदत होणार आहे. वर्षानुवर्ष पाऊस झाल्यानंतर ओढा दुथडी भरून वाहतो मात्र पावसाचे पाणी पूर्णपणे वाहून जात असल्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा फारसा फायदा होत नाही. दीर्घकाळ शेतकऱ्यांना ओढ्यात साचलेल्या पाण्याचा जलस्रोत बळकट होऊन दृश्य व अदृश्य असा फायदा होणार असल्याची माहिती सरपंच मुरलीधर ठोंबरे यांनी दिली. मासाळवाडी ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात १०० टक्के ओढा खोलीकरण, याबरोबर जलस्रोत बळकटीकरणाची व जलसंधारणाची कामे करण्याचा विचार असून यामध्ये लोकसहभाग व ग्रामपंचायतीच्या सक्रिय सहभागाची तयारी आहे. सामाजिक संस्थांनी शेतकऱ्यांना शाश्वत पाणी मिळवून देण्यासाठी जलसंधारणाची कामे प्राधान्याने करावी, अशी अपेक्षाही येथील शेतकऱ्यांनी व्यक्त केली. या कामामुळे टंचाईग्रस्त भागात बारमाही तिन्ही हंगामात शेतकऱ्यांना फायदा होण्यास मदत होणार आहे.

‘सकाळ’च्या ऋणात राहू
सामाजिक बांधिलकी जपत ‘सकाळ’माध्यम समूहाने मासाळवाडीसह जिरायत भागातील टंचाईग्रस्त गावात गेली १० वर्षे सातत्याने ओढा खोलीकरण काम केले आहे. त्यामुळे अनेक गावातील दुष्काळग्रस्त परिस्थिती आटोक्यात आली असून आम्ही शेतकरी ‘सकाळ’च्या कायम ऋणात राहू, अशी प्रतिक्रिया मासाळवाडीचे सरपंच मुरलीधर ठोंबरे, माऊली भापकर, शरद मासाळ, लोणी भापकरचे सरपंच रवींद्र भापकर, भाऊसाहेब कांबळे, भगवान धायगुडे यांनी दिली.

3402

Marathi News Esakal
www.esakal.com