जनाई- शिरसाईचा नारळ फोडायचा राहूनच गेला

जनाई- शिरसाईचा नारळ फोडायचा राहूनच गेला

Published on

मोरगाव, ता. २८ : बारामतीच्या जिराईत भागातील शेतीची आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विडा उचलला होता. यामध्ये वंचित गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी पाहिलेले नीरा- कऱ्हा नदीजोड प्रकल्पाचे स्वप्न हे अपुरेच राहिले, तर दुसरीकडे जनाई- शिरसाई योजनेच्या बंदिस्त जलवाहिनीसाठी ४२५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून एक स्वप्न पूर्ण केले. मात्र, त्या कामाच्या शुभारंभ करण्याचा नारळ फोडण्याचे राहूनच गेले.
बारामती तालुक्यातील सुपे भागात जनाई- शिरसाई, तर मोरगाव भागात पुरंदर उपसा सिंचन योजना राबवली. मात्र, जनाई- शिरसाई व नीरा डावा कालवा यांचे लाभक्षेत्र सोडून वंचित भागासाठी नीरा- कऱ्हा प्रकल्प राबविण्याचा मतदारांना त्यांनी शब्द दिला होता. या प्रस्तावास प्रशासकीय मंजुरी मिळाली असून, दादांचे हे स्वप्न पूर्ण करण्याचे अपूर्णच राहिले.
बारामतीच्या पश्चिम पट्ट्याचे जिराईत नाव पुसून ते बागायत करण्याचा कायापालट पाण्याचा प्रश्न सोडवून फक्त अजित पवारच करणार हे आश्वासन विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भागातील नागरिकांना दिले होते. दिलेला शब्द खरा करणारा नेता म्हणून अजित पवारांची खास ओळख होती. विधानसभा निवडणुकीनंतर नीरा- कऱ्हा नदीजोड प्रकल्प लवकर सुरू होण्यासाठी त्यांनी वेगाने सूत्र फिरविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, दुर्दैवाने काळाने त्यांच्यावर झडप घातली आणि त्यांचे स्वप्न हे अपुरेच राहिले.
टंचाईग्रस्त गावात शेती सिंचनाचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी पुरंदर उपसा सिंचन योजनेबरोबरच नीरा- कऱ्हा जोड प्रकल्प उपसा सिंचन योजनेसाठी एक हजार कोटी रुपये अजित पवार यांनी मंजूर केले. नीरा नदीवरून पाणी आणून वंचित गावांसाठी कायमस्वरूपी कार्यान्वित झाल्यास बारामतीच्या भागांमध्ये शेती सिंचनाचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. नीरा- कऱ्हा नदीजोड प्रकल्प उपसा सिंचन योजनेसाठी एक हजार कोटी रुपयांची मंजुरी घेऊन त्यामधील ५०० कोटी रुपये संबंधित सिंचन योजनेवर वर्ग केल्याची प्राथमिक माहिती आहे. जनाई शिरसाई योजना ५८ कोटींच्या निधीतून काही वर्षांपूर्वी सुरू झाली. मात्र, या योजनेचा लाभ बारामती, पुरंदर आणि दौंड या तीनही तालुक्यातील शेतकऱ्यांना होण्यासाठी या योजनेच्या बंदिस्त जलवाहिनीसाठी विशेष पाठपुरावा केला. जनाई- शिरसाई योजना शेतकऱ्यांसाठी वरदान ठरली आहे. शाश्वत शेती सिंचनाचा प्रश्न हा या योजनेमुळे सुटण्यास मोठी मदत झाली. एकीकडे जनाई- शिरसाईसाठी त्यांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण झाले. मात्र, बंदिस्त जलवाहिनीच्या कामाच्या भूमिपूजनाचा नारळ फोडण्याचे स्वप्न मात्र स्वप्नच राहिले.

सतत धडपडणारा नेता
जिराईत भागात पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी कोणत्या उपाययोजना प्रभावी ठरतील याचे सूक्ष्म निरीक्षण स्वतः करून त्याची अंमलबजावणी सरकारी योजना, विविध कंपन्यांचा सीएसआर फंड यातून करण्यासाठी सतत धडपडणारा नेता म्हणून घराघरांमध्ये अजित पवार यांची ओळख होती. जलसंधारण, जलस्रोत बळकटीकरण, प्रादेशिक योजना, सिमेंट बंधारे यामध्ये प्रत्येक गाव व प्रत्येक गावाची वाडी वस्ती यामध्ये भेट देऊन सांगितलेले विषय योग्य समन्वय संवाद साधून अतिशय जबाबदारीने व आपुलकीने सोडविण्याचे काम अजित पवार करत होते. त्यामुळे त्यांच्या अकाली अपघाती मृत्यूमुळे बारामतीच्या जिराईत पट्ट्यात प्रत्येक गावाने कडकडीत बंद पाळला असून सर्वत्र शोककळा पसरली आहे.

सर्वसामान्यांचा आधारवड हरपला
बारामती तालुका १०० टक्के टँकर मुक्त करण्यासाठी अजित पवार यांचे मोलाचे योगदान आहे. बारामतीच्या जिराईत भागासाठी जलदूत बनवून त्यांनी कोट्यवधी रुपयांच्या निधीमधून मुर्टी प्रादेशिक, लोणी भापकर प्रादेशिक योजना राबवली. त्यामुळे १८ पेक्षा जास्त गावे टँकर मुक्त झाली. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर असणारा सर्वसामान्यांचा आधारवड हरपला, अशी भावना सर्वसामान्यातून व्यक्त होत आहे.

03490

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com