
चांडोली येथे बिबट्याच्या हल्ल्यात कालवड ठार
महाळुंगे पडवळ, ता. १४ : चांडोली बुद्रुक (ता. आंबेगाव) येथे शेतकरी शंकर लक्ष्मण थोरात यांच्या गोठ्यात दोन बिबट्यांनी केलेल्या हल्ल्यात तीन गाई जखमी झाल्या असून दीड वर्षाची कालवड ठार झाली आहे. सोमवारी (ता. १३) रात्री सदर घटना घडली.
चांडोली बुद्रुक ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात गोपाळवाडी येथे थोरात कुटुंबीयांचा घरालगत गाईची गोठा आहे. रात्री गाई हंबरण्याचा आवाज झाल्याने गौरी थोरात यांना जाग आली. त्यांनी गोठ्यात पहिले असता त्यांना दोन बिबटे दिसले. घरातील सदस्यांनी आरडाओरड केल्यानंतर बिबट्यांनी धूम ठोकली. राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे स्वीय सहाय्यक रामदास वळसे पाटील व विजय थोरात यांनी वनविभागाला बिबट्याने हल्ला केल्याची माहिती दिली. त्यानुसार वनरक्षक प्रदीप औटी व वनमजूर जालिंदर थोरात यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून पंचनामा केला आहे. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अजय कोल्हे यांनी शवविच्छेदन केले. शेतकऱ्याचे सुमारे तीस हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. यावेळी ग्रामपंचायत सदस्य गोविंद थोरात, विशाल थोरात, गौरी सागर थोरात उपस्थित होते.
“चांडोली बुद्रुक व लौकी परिसरात नेहमीच बिबट्याचा वावर आहे. गेल्या १५ दिवसापासून बिबट्यांचे दिवसही दर्शन नागरिकांना होत आहे. तसेच पाळीव प्राण्यांवर बिबट्याने हल्ले सुरु केल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. वनविभागाने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावावा,’’ अशी मागणी शेतकरी शंकर ऊर्फ नाना लक्ष्मण थोरात यांनी केली आहे.