कळंबला दीड एकरातील उसात बहरला कोबी
महाळुंगे पडवळ, ता. ७ : कळंब (ता.आंबेगाव) येथील शेतकरी विजयकुमार दत्तात्रेय कहडणे यांनी उसात आंतरपीक म्हणून कोबीची लागवड केली. परिसरातील विविध कंपन्यांच्या खरेदी केंद्रांकडून प्रतिनग या प्रमाणे १० ते १२ रुपये बाजारभाव मिळाला. खर्च वजा जाता त्यांना एक लाख वीस हजार रुपये उत्पन्न मिळाले आहे.
कहडणे यांनी शेताची नांगरणी करून माती भुसभुशीत समतल करून कुजलेले शेण शेतात टाकले. दीड एकर क्षेत्रात उसाची लागवड केली होती. त्याच क्षेत्रात त्यांनी जुलै महिन्यात वीस हजार कोबी रोपांची लागवड केली. अति मुसळधार पावसाने कोबीची पाच हजार रोपे खराब झाली. लागवडीनंतर वेळोवेळी खुरपणी करून खतांची मात्रा दिली. कृषी तज्ज्ञ रवींद्र वर्पे यांच्या मार्गदर्शनाखाली कोबी पिकाला पतंग, पाने खाणारी अळी, मावा, सफेद माशी, करपा, मर, डाऊनी व इतर रोगांचे व किडींचे सुरुवातीपासूनच व्यवस्थित नियोजन केले. त्यामुळे कोबीची चांगली वाढ झाली.
कोबीचा वापर फास्ट फूड, सॅलड आणि भाजी म्हणून केला जातो, त्यामुळे कोबीला असलेली मागणी लक्षात घेऊन ऊस पिकात आंतरपीक म्हणून कोबीची लागवड करण्याचा निर्णय घेतला. पावसामुळे २५ टक्के नुकसान झाले. लागवडीपासून ७० ते ७५ दिवसांनी कोबीची काढणी सुरू केली. कळंब येथील खरेदी केंद्राकडून कोबीला चांगली मागणी होती.
खरेदी केंद्रांकडून सरासरी १० ते १२ रुपये प्रती गड्डा याप्रमाणे बाजारभाव मिळाला. एकूण एक लाख पन्नास हजार रुपये मिळाले. त्यातून खते, औषधे, मजुरी आणि रोपे असा एकूण तीस हजार रुपये खर्च झाला. योग्य नियोजन केल्यास यातून शेतकऱ्यांसाठी चांगला नफा मिळवणे शक्य आहे.
- विजयकुमार कहडणे, कोबी उत्पादक
03382