गणेशवाडी-चासमध्ये बिबट्या जेरबंद
महाळुंगे पडवळ, ता.१३ : गणेशवाडी-चास (ता.आंबेगाव) येथे वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात गुरुवारी (ता.१३) पहाटे बिबट्या जेरबंद झाला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. या गावात गेल्या पाच वर्षांत पकडलेला हा सातवा बिबट्या आहे.
ठाकरवाडी आणि चास ग्रामपंचायतीच्या सरहद्दीवर गणेशवाडी, मांझीरेवस्ती परिसरात बिबट्याचा वावर होता. त्याने पाळीव कुत्री फस्त केली होती. चास ते ठाकरवाडी रस्त्याने जात असताना दिवसाही अनेक नागरिकांनी बिबट्याला ये-जा करताना पाहिले होते. वनविभागाने या परिसरात बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावावा, अशी मागणी पुणे जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या तुलसी सचिन भोर, ठाकरवाडीचे सरपंच आशा खंडू पारधी व उपसरपंच विजय बारवे यांनी केली होती.
वनविभागाने बाळासाहेब बारवे यांच्या शेतात मंगळवारी (ता.११) बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावला होता. भक्ष्य म्हणून दोन कोंबड्या ठेवल्या होत्या. बिबट्या पिंजऱ्यात गुरुवारी (ता.१३) पहाटे अडकल्याची माहिती रेक्यू सदस्य सुशांत चासकर यांनी वनविभागाला दिली. त्यानुसार वनरक्षक रईस मोमीन, वनसेवक काळूराम गायकवाड, शीघ्र कृती दल गावडेवाडी यांनी बिबट्याला ताब्यात घेऊन अवसरी घाट वन उद्यानात ठेवले आहे. दहा ते बारा वर्षांचा नर जातीचा बिबट आहे. यावेळी पोलिस पाटील वैभव शेगर, दिलीप चासकर, खंडू पारधी, विजय बारवे आदी उपस्थित होते.
03447

