महाळुंगे पडवळ येथे उद्या, सोमवारी विविध कार्यक्रम
महाळुंगे पडवळ, ता. १० : हुतात्मा बाबू गेनू सैद व दिवगंत माजी आमदार अण्णासाहेब आवटे यांच्या पुण्यतिथीनिमित्त महाळुंगे पडवळ (ता. आंबेगाव) येथे शुक्रवारी (ता. १२) रक्तदान शिबिर, डोळे तपासणी व उपचार, भजन स्पर्धा आणि सोमवारी (ता. १५) मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे,’ अशी माहिती शरद सहकारी बँकेचे संचालक के. के. सैद आणि हुतात्मा बाबू गेनू युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाबाजी चासकर यांनी दिली.
हुतात्मा बाबू गेनू सैद यांच्या स्मारकातील स्मृतिस्तंभाला माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, पद्मश्री मुरलीकांत पेटकर, खासदार अमोल कोल्हे, पुणे म्हाडाचे अध्यक्ष माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील आदी प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत पुष्पचक्र अर्पण करण्यात येणार असल्याची माहिती सरपंच सुजाता चासकर आणि उपसरपंच अलका पडवळ यांनी दिली.
शुक्रवारी (ता. १२) हुतात्मा बाबू गेनू स्मारकात दिवंगत न्यायाधीश राजकुमार आंबेकर यांच्या स्मरणार्थ सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. दुपारी बारा वाजता संगीत भजन स्पर्धा आयोजित केल्या आहेत. हुतात्मा बाबू गेनू स्मारक येथे मोफत डोळ्यांचे आरोग्य शिबिर आयोजित केले असून, मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत केली जाणार आहे. मोफत तपासणी, औषधोपचार, ऑपरेशननंतरचा आहार व काळजी यांची सर्व सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. सोमवारी (ता. १५) यशवंतराव चव्हाण मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या वतीने आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन केले आहे.

