

महाळुंगे पडवळ, ता. २३ : रस्त्यांवर होणाऱ्या अपघातांमुळे नागरिकांना मोठा वैद्यकीय खर्च करावा लागत आहे. या खर्चाची जबाबदारी शासनाने स्वीकारावी, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आंबेगाव तालुका विद्यार्थी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी उपाध्यक्ष योगेश भोर यांनी पाठविलेल्या निवेदनात केली आहे.
राज्यातील रस्त्यांची निकृष्ट अवस्था, मोठ्या प्रमाणात पडलेले खड्डे, अपूर्ण रस्ते, योग्य सूचना फलकांचा अभाव व धोकादायक वळणे आदी कारणांमुळे दिवसेंदिवस अपघातांची संख्या वाढत आहे. त्यात अनेक निष्पाप नागरिक गंभीर जखमी होत असून, त्यांना रुग्णालयात मोठा वैद्यकीय खर्च करावा लागत आहे. रस्ते बांधकाम, देखभाल व वाहतूक सुरक्षिततेची जबाबदारी संबंधित शासकीय यंत्रणेची आहे. जखमी नागरिकांचा संपूर्ण उपचार खर्च केंद्र, राज्य सरकार, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय, सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडून करण्यात यावा. पोलिस आणि अन्य अधिकारी नेहमीच वाहन चालकांकडून दंड वसूल करतात. या निधीचा उपयोग जनतेच्या सुरक्षेसाठी आणि अपघातग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी वापर होणे आवश्यक आहे. याबाबत स्पष्ट आणि कायमस्वरूपी धोरण निश्चित करून अपघातग्रस्त नागरिक आणि त्यांच्या कुटुंबीयांना दिलासा मिळेल अशी व्यवस्था करावी, अशी मागणी निवेदनात केली आहे.