हंडाभर पाण्यासाठी महिलांच्या नशिबी डोंगराची चढण

हंडाभर पाण्यासाठी महिलांच्या नशिबी डोंगराची चढण

महुडे, ता. ३ : नीरा देवघर धरणा जवळील पर्हर बुद्रुक (ता. भोर) येथील कचरे व उंब्राटकर वस्ती येथील तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. येथील महिलांना दोन किलोमीटर पायपीट करून धरणातून डोक्यावर‌ हांडे घेऊन पाणी आणावे लागत आहे. डोंगरावरील चढ चढताना महिलांची हंडाभर पाण्यासाठी दरवर्षीच दमछाक होत असते.


पर्हर ग्रामस्थांनी टँकरचा प्रस्ताव पंचायत समिती पाणीपुरवठा विभागाकडे दिला आहे. मात्र, अद्याप ग्रामस्थ टँकरच्या प्रतीक्षेत आहेत. काही नागरिक निगुडघर येथून सातशे रुपये खर्च करून मोटरीने अथवा चारपाच कुटुंब मिळून सतराशे रुपये खर्च करून टँकर मागवून स्वखर्चाने विकतचे पाणी आणत आहेत. यामुळे लवकर टँकर सुरू करण्याची मागणी होत आहे.

कचरे वस्ती येथे ६०-७० तर उंब्राटकर वस्ती येथे ४०-५० लोकसंख्या आहे. पर्हर गावठाण येथील जलवाहिनीने पाणी नेण्यासाठी ज्ञान प्रबोधिनी संस्थेकडून पाइप दिला आहे तर लोकवर्गणी व ग्रामपंचायत निधीमधून चारी खोदून, पाइप जोडणीचा मजुरी व इतर खर्च अंदाजे दीड लाख रुपये झाला आहे. अजून ५० हजार खर्च अपेक्षित आहे.

पर्हर बुद्रुकमधील आखाडेवस्ती, कचरेवस्ती, डोईफोडे वस्ती, उंब्राटकर वस्तीसाठी ३९ लाख रुपये निधीतून पाणीपुरवठा योजना पूर्ण झाली आहे. परंतु विहीर नसल्याने या योजनेत मोटारीने धरणातील पाणी उचलले जाते. सध्या नीरा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने पाण्याने तळ गाठला आहे. पर्यायाने योजनेचे पाइप उघडे पडत आहेत.

मीनाताई ठाकरे योजनेअंतर्गत एक कोटीचा प्रस्ताव मंजुरीसाठी सादर केलेला आहे. त्यास मंजुरी मिळाली तर पर्हरचा पाण्याचा प्रश्न कायमचा मिटेल. तसेच कायम स्वरूपी पाण्यासाठी नवीन विहीर व जलजीवन मिशन अंतर्गत सुधारित प्रस्ताव सादर केला आहे. असे पाणी पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.

धरणात असलेल्या बोअरवेलमध्ये मोटर अडकल्याने दुसरी जलवाहिनी बंद आहे. ग्रामपंचायतीमार्फत नवीन बोअरवेल घेण्यात येणार आहे. परंतु त्यासाठी धरणातील पाणीसाठा अजून कमी होऊन तेथील ओलावा हटल्यानंतर तेथे बोअरवेलचे वाहन नेणे शक्य होणार आहे. त्यासाठी थोडे दिवस वाट पाहावी लागणार आहे.
- महेश कालेकर, ग्रामसेवक

पर्हर हा भाग पूर्ण डोंगराळ असल्याने उन्हाळ्यात पाण्याचे स्रोत कमी होऊन शिवकालीन टाक्या, विहिरी कोरड्या पडतात. डोंगरदरे फिरून तसेच दोन किमी धरणावरून पायपीट करत पाणी आणावे लागते. उन्हाळ्यात पंचायत समितीला प्रत्येक वेळी टॅंकरचा प्रस्ताव दिला जातो. ही कायमस्वरूपाची पाण्याची समस्या दूर करण्यासाठी प्रशासनाने ठोस उपाय योजना करण्याची गरज आहे.
- रामभाऊ कचरे, ग्रामस्थ


टँकरचा प्रस्ताव तत्काळ तहसिल विभागाकडे सादर करण्यात आला आहे. दोनचार दिवसातच टँकर सुरु होईल. टंचाईपुरक आराखड्यात २० लक्ष निधीचा प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे.
- ए. ए. आडे, उपअभियंता पाणीपुरवठा विभाग, पंचायत समिती, भोर


00593, 00595

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com