इस्रो, नासा भेटीसाठी निवडणार ७५ विद्यार्थी

इस्रो, नासा भेटीसाठी निवडणार ७५ विद्यार्थी

Published on

हिर्डोशी, ता. ५ : विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड तसेच संशोधनाची गोडी निर्माण व्हावी, या उद्देशाने इस्रो व नासा अंतराळ संशोधन संस्थेस भेट देण्यासाठी जिल्हा परिषद शाळेतील सहावी व सातवीमधून ७५ विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. त्यासाठी केंद्र स्तरावर शनिवारी (ता. ५) झालेल्या परीक्षेत भोर तालुक्यातील नोंदवलेल्या १६२३ विद्यार्थ्यांपैकी १४८४ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. तर १३९ विद्यार्थी गैरहजर राहिले.
भोरचे गटविकास अधिकारी किरणकुमार धनवाडे, सहाय्यक गटविकास अधिकारी उदय जाधव व गटशिक्षणाधिकारी राजकुमार बामणे यांच्या मार्गदर्शनाखाली घेतलेल्या परीक्षेसाठी विद्यार्थी संख्येनुसार केंद्र निश्चिती व बैठक व्यवस्था केली होती. शिक्षण विभाग सोडून पंचायत समितीच्या इतर विभागातील ८१ पर्यवेक्षकांची नियुक्ती केली होती.
परीक्षा ओएमआर शीटवर सकाळी ११ ते १२ या वेळात श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल भोर, श्री शिवाजी विद्यालय किकवी, श्री शिवाजी विद्यालय भागशाळा कापूरहोळ, श्री काशिनाथराव खुटवड विद्यालय, हातवे बुद्रूक, विजय मुकुंद आठवले विद्यालय माळेगाव, महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय शिंदेवाडी, क्रांतिवीर वासुदेव फडके विद्यालय रावडी, आपटी माध्यमिक विद्यालय, रायरी माध्यमिक विद्यालय, श्री वीर बाजी प्रभू विद्यालय शिंद, न्यू इंग्लिश स्कूल संगमनेर, समर्थ विद्या मंदिर, वेळवंड, जिल्हा परिषद शाळा भुतोंडे या १३ केंद्रावर घेतली.

अशी असेल विद्यार्थ्यांची निवड
प्रथम झालेल्या केंद्र स्तरावरील परीक्षेतील उत्तर पत्रिकांची तपासणी स्कॅनिंग मशिनद्वारे जिल्हास्तरावरून करण्यात येणार आहे. निकालानंतर तालुक्यातील एकूण विद्यार्थ्यांच्या ५ टक्के या प्रमाणामध्ये उच्च गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांची निवड करून त्यांची तालुकास्तरावर परीक्षा घेतली जाणार आहे. यातून गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांची १ः४ प्रमाणात निवड करून त्यांना आयुका या संस्थेच्या कॅम्पस भेटीसाठी पाठवले जाणार आहे. यातून विद्यार्थ्यांची चौकस बुद्धी व वैज्ञानिक दृष्टिकोनाविषयी निरीक्षण करून व मुलाखतीद्वारे ४:१ या प्रमाणात एकूण ७५ विद्यार्थ्यांची अंतिम निवड केली जाणार आहे. पासपोर्ट व व्हिसा काढण्याची प्रक्रिया केल्यानंतर ७५ विद्यार्थ्यांमधून ५० विद्यार्थी, ५ अधिकारी व ४ शिक्षक यांना इस्रो तर २५ विद्यार्थी, ५ अधिकारी व ४ शिक्षक यांना नासा या अंतराळ संस्थेस भेटीसाठी पाठवले जाणार आहे. या भेटीसाठीचा सर्व खर्च जिल्हा नियोजन निधी, जिल्हा परिषद निधीमधून केला जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com