खानापूर- बाजारवाडी पाले रस्त्याची दुरवस्था

खानापूर- बाजारवाडी पाले रस्त्याची दुरवस्था

Published on

हिर्डोशी, ता. ११ : खानापूर ते बाजारवाडी पाले (ता. भोर) रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने रस्त्याची दुरवस्था झाली आहे. यातून वाहनचालक, प्रवाशांना ये- जा करताना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे तातडीने खड्डे बुजविण्याची मागणी स्थानिकांकडून होत‌ आहे.
भोर- मांढरदेवी मार्गावरील खानापूरपासून सुरू झालेल्या या रस्त्यावर हातनोशी, बाजारवाडी, धावडी, पळसोशी, पाले, वरोडी ही गावे लागतात. तसेच, किल्ले रोहिडेश्वर, शिवकालीन संगमेश्वर मंदिर, गणेश मंदिर, डोंगरावरची श्री वाघजाई देवीसाठी जाणाऱ्या भाविकांना व पर्यटकांना याच खड्डेमय रस्त्याने जावे लागत आहे. मुंबई, पुणे येथे कामानिमित्त वास्तव्यास असलेले या भागातील नागरिक गणेशोत्सव काळात गावाकडे आले असल्याने या रस्त्यावर वर्दळ वाढली होती. त्यांनाही रस्त्यावरील खड्ड्यांचा सामना करावा लागत आहे. मात्र, संबंधित विभागाचे दुर्लक्ष याकडे आहे.
सन २०१८ साली खानापूर ते पाले या रस्त्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून अंदाजे साडेतीन कोटी मंजूर निधीतून रस्त्याचे काम झाले. त्यानंतर रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीची पाच वर्षाची मुदत सन २०२३ ला संपून गेली आहे. सद्यपरिस्थितीत रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांची डागडुजी करणे गरजेचे होते. मात्र, तसे झाल्याचे कुठेही दिसत नाही. तसेच, रस्त्याशेजारी झाडे- झुडपे यांची वाढ झाली असल्यामुळे वळणावर समोरून येणारी वाहने दिसत नाहीत. काही ठिकाणी रस्ता अरुंद झाला आहे. यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
दुचाकीसह वाहने पंक्चर होण्याचे प्रमाण वाढत असल्याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. संबंधित विभागाने खड्ड्यांची डागडुजी, तसेच रस्त्याशेजारी वाढलेली झाडे- झुडपे हटवावीत, अशी मागणी धावडी राऊतवाडीचे संपत दरेकर यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे.

जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत ३०/५४ मधून १ कोटी ३५ लाख रुपयांचा निधी मंजूर असून, निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. लवकर या कामास सुरुवात केली जाणार आहे.
-पद्माकर चांडके, शाखा अभियंता, बांधकाम विभाग पंचायत समिती, भोर

02465

Marathi News Esakal
www.esakal.com