महायुतीतच रंगणार लढत

महायुतीतच रंगणार लढत

Published on

महायुतीतच रंगणार लढत

भोर पंचायत समितीच्या सभापतिपदाचे आरक्षण सर्वसाधारण महिलेसाठी जाहीर झाल्याने निवडणुकीत मोठी रंगत पाहायला मिळणार आहे. निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी प्रत्येक पक्षाकडून केलेली दिसून येत असल्याने यंदाची निवडणूक बहुरंगी होईल, असे सध्या तरी दिसत असले, तरी प्रमुख पक्षांकडून उमेदवारी जाहीर झाल्यावरच लढतींचे खरे चित्र समोर येईल. मात्र, सध्यातरी आजी- माजी आमदार पंचायत समितीवर आपल्या पक्षाचा झेंडा लावण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे.

- विलास मादगुडे, हिर्डोशी

भोर पंचायत समितीमध्ये मागील पंचवार्षिक निवडणुकीत सहा गण होते. परंतु, यावेळी आठ गण झाले आहेत. त्यापैकी तीन गण सर्वसाधारण, तीन गण सर्वसाधारण महिला, एक गण नागरिकांचा मागासवर्ग व एक गण नागरिकांचा मागासवर्ग महिलेसाठी आरक्षीत आहे. पहिल्या अडीच वर्षासाठी सभापतिपद हे सर्वसाधारण महिलेसाठी आहे. त्यामुळे सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षीत असलेल्या कामथडी गणात इच्छुकांची संख्या मोठी आहे. तेथे प्रमुख पक्षांतून, तर शिंद आणि उत्रौली गणातून सध्यातरी भाजप विरुद्ध राष्ट्रवादी कॉंग्रेस, अशीच लढतीचे चित्र आहे.
वेळू, नसरापूर व भोंगवली हे गण सर्वसाधारण असल्याने येथे प्रत्यक्ष पक्षाकडून तोडीस तोड उमेदवार देऊन तुल्यबळ लढती पाहायला मिळणार आहेत. पुढील अडीच वर्षासाठीचे सभापतिपदाचे आरक्षण नागरिकांचा मागास प्रवर्ग किंवा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलेसाठी निघाले, तर सभापतीची माळ आपल्याच गळ्यात पडेल, या आशेने भोलावडे व कारी (महिला) या दोन्ही आरक्षीत गणातील लढती तुल्यबळ होतील.
आठही गणात उमेदवारी डावलेले प्रमुख इच्छुक दुसऱ्या पक्षाकडेही तिकिटासाठी दावा करू शकतील, अशी परिस्थिती सध्या दिसून येत आहे. शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात फूट पडल्याचा फटका नक्की कोणाला बसणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
भोर पंचायत समितीत मागील तीन पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादीचा वरचष्मा राहिला आहे. मागील पंधरा वर्षे काँग्रेसचे संग्राम थोपटे हे आमदार होते, परंतु यावेळी झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शंकर मांडेकर हे आमदार झाले आहेत. त्यानंतर संग्राम थोपटे यांनी आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला. आजी-माजी आमदारांसह विधानसभा लढलेले शिवसेनेचे (शिंदे) कुलदीप कोंडे महायुतीत आहेत. परंतु भोरमध्ये युती होणार नसल्याचे संकेत दिसून येत आहे. त्यामुळे खरी लढत महायुतीतच होणार आहे. तरीही राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष किती ठिकाणी उमेदवारी लढवतायेत, तसेच त्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

सन २०१७मधील पक्षीय बलाबल
राष्ट्रवादी काँग्रेस- ४ (उत्रौली, कारी, नसरापूर, भोलावडे), कॉंग्रेस- एक (भोंगवली), शिवसेना- एक (वेळू).

स्थानिक प्रश्न
- ग्रामीण भागातील रस्ते
- पाण्याची अर्धवट राहिलेली कामे
- आरोग्य व पशुसंवर्धन विभाग
- विजेच्या समस्या
- रोजगार निर्मिती
- शेतीसाठी प्रोत्साहनपर योजना
- औद्योगिक वसाहत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com