डोळ्यांविनाही अनुभवला निसर्गाचा अद्‌भुत स्पर्श

डोळ्यांविनाही अनुभवला निसर्गाचा अद्‌भुत स्पर्श

Published on

हिर्डोशी, ता.१३ : किल्ले रायरेश्वर (ता. भोर) पठारावर पुण्यातील येवलेवाडी कोंढवा येथील नवजीवन अंध अपंग कल्याण मंडळ संचलित अंध अपंग प्रशिक्षण केंद्र व वसतिगृहातील अंध मुलांसाठी शुक्रवारी (ता.१२) आयोजित प्रेरणादायी निसर्ग सहलीत २४ अंध मुलामुलींनी सहभाग घेतला.
सेवानिवृत्त वनाधिकारी लक्ष्मण शिंदे यांनी प्रशिक्षण केंद्रात दिलेल्या व्यसनमुक्ती विषयावरील व्याख्याना दरम्यान झालेल्या निसर्ग सहलीबाबतच्या चर्चेतून छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतलेल्या किल्ले रायरेश्वर पठारावर अंध मुलांना निसर्ग अनुभव देण्याचा केलेला संकल्प प्रत्यक्षात पूर्ण केला. रायरेश्वराच्या पायथ्याशी मुलांना आवश्यक सूचना देण्यात आल्या. यावेळी आम्ही सहजपणे पठार गाठू असा आत्मविश्वास मुलांनी व्यक्त केला. पायथ्यालाच वनाधिकारी गणेश रणवरे यांचा वाढदिवस साजरा करून चढाईला सुरुवात केली. छत्रपती शिवाजी महाराज की जय, हर हर महादेव अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
दृष्टिहीन असूनही मुलांनी चढ-उतार, दगडी पायऱ्या व लोखंडी शिड्या सहज पार करत रायरेश्वर पठार गाठले. त्यानंतर सुमारे एक ते दीड किलोमीटरचा प्रवास आनंदात करत सर्व मुले मंदिरापर्यंत पोहोचली व रायरेश्वराचे दर्शन घेतले. पठारावर शिवाजी जंगम यांच्या येथे मुलांना नाचणीची भाकरी, वरण-भाताचे स्वादिष्ट जेवण देण्यात आले. त्यानंतर त्यांच्या ओसरीत निसर्ग कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले. या संमेलनात अंध मुलामुलींनी उत्स्फूर्तपणे कविता सादर केल्या. यावेळी बालकवी अस्मिता रांजणे हिनेही आपल्या कविता सादर केल्या. लक्ष्मण शिंदे यांनी निसर्गगीतांची सादरीकरण करून मुलांची करमणूक केली. कविता सादर करणाऱ्या मुलांना रोख स्वरूपात बक्षिसे देण्यात आली. कार्यक्रमाची सांगता अंध मुलांनी सादर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांवरील गीताने झाली.
या सहलीत संस्थेचे मिलिंद फाळके, आविष्कार कोंडे, दीपाली पाबळ,भारती कोमल यांचा सक्रिय सहभाग होता. सहल यशस्वी करण्यासाठी गणेश रणवरे, धनंजय देशपांडे, सुनील माळवे, अक्षय शितोळे, महेश बोराटे, अजित रांजणे यांनी मोलाचे सहकार्य केले. या सहलीत अंध असूनही मुले खूप आनंदी दिसून आले. त्यांची इच्छाशक्ती, आत्मविश्वास आणि जिद्द प्रेरणादायी व वाखाणण्याजोगी होती असे शिंदे यांनी सांगितले.

2868

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com