गव्हावर मावा, तुडतुडे किडीचा प्रादुर्भाव

गव्हावर मावा, तुडतुडे किडीचा प्रादुर्भाव

Published on

हिर्डोशी, ता.२७ : किल्ले रायरेश्वर (ता.भोर) येथील पठारावर केल्या जात असलेल्या नैसर्गिक गव्हाच्या शेतीवर मावा, तुडतुडे किडीचा प्रादुर्भाव झाला असल्याने यावर्षी गहू पिकाच्या उत्पादनात घट होणार आहे.

रायरेश्वर येथे ४० हून अधिक जंगम कुटुंब वास्तव्यास असून, त्यांचे गहू हेच प्रमुख पीक आहे. याच पिकाच्या उत्पादनावर येथील ग्रामस्थांचे वर्षाभराचे गणित अवलंबून असते. किडींच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडणार आहे.
येथील ग्रामस्थ बैल व मनुष्याद्वारे पारंपरिक पद्धतीने मशागत करून नैसर्गिक गव्हाची शेती मोठ्या प्रमाणात करत आहेत. या गव्हाच्या शेतीला कोणत्याही प्रकारचे पाणी दिले जात नाही. तसेच रासायनिक खते, औषधांचा वापरही केला जात नाही. पेरणीसाठीचे बियाणेसुद्धा बाजारातून न आणता पारंपरिक पद्धतीने पिकत असलेल्या शेतीतील वापरले जाते. केवळ शेणखताचा वापर केला जात असून ही गहू शेती पूर्णपणे पडत असलेल्या दव व थंडीच्या गारव्यावर अवलंबून असते. यावर्षी सुरवातीला थंडीचा कडाका वाढला असल्याने या थंडीच्या दिवसांत गव्हाची उगवण चांगली झाली. परंतु, सध्या दिवसभर ढगाळ वातावरण,दमट हवामान, रात्री गारवा आणि पहाटे कडाक्याची थंडी, दव आणि धुके अशा बदलत्या वातावरणा मुळे रोग जंतूंची वाढ झाली. त्यातूनच गव्हावर मावा रोग, तुडतुडे प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे गव्हाच्या पिकाला फटका बसला आहे.

रायरेश्वर येथील गहू शेतीवर मावा, तुडतुडेचा प्रादुर्भाव झाला आहे. येथील शेतकरी कोणतीही फवारणी करत नाहीत. परंतु, पीक वाचवण्यासाठी शेतकर्ऱ्यांनी कृषी विभागाच्या सल्ल्याने औषध फवारणी करणे गरजेचे आहे. तसेच शेतकऱ्यांनी शासनाने बनवलेल्या महाविस्तार एआय ॲपचा मोबाईलमध्ये वापर करून पिकांसंबधीच्या समस्या, रोग, योजना, हवामान, बाजारभाव आदी कृषीविषयक माहिती घ्यावी.
- प्रशांत सपकाळ, सहायक कृषी अधिकारी,रायरी

रायरेश्वराच्या आशीर्वादाने वाडवडिलांपासून आजतागायत नैसर्गिक गव्हाची केली जातेय. परंतु, रोगामुळे गहु पीक पिवळे पडले आहे. धोक्यात आले आहे. या गव्हाच्या शेतीवर वर्षभराची आर्थिक गणिते अवलंबून असतात. परंतु यावर्षी उत्पादनात घट होणार आहे.
- सखाराम जंगम, शेतकरी रायरेश्वर

असा करा जैविक उपाय
पीक वाढीच्या अवस्थेत १५० मिली दशपर्णी अर्क हे १५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. पीक वाढीच्या अवस्थेत पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. किडीच्या एकात्मिक नियंत्रणासाठी लेडी बर्ड बीटल (ढाल किडा) या परभक्षी किडीचे प्रौढ एक लाख प्रतिएकर सोडावीत.

रासायनिक उपाय
किडीच्या संख्येने आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडली असेल तर २० मिली डायमीथोएट ३० टक्के ई.सी. हे १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. किंवा १० मिली क्विनॉलफॉस २५ टक्के हे १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. किंवा ५ ग्रॅम थायमेथॉक्सोम २५ टक्के डब्लू जी. हे १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

02929

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com